सचिन पिळगावकर यांना मिळणार ‘गंधार गौरव पुरस्कार...

सचिन पिळगावकर यांना मिळणार ‘गंधार गौरव पुरस्कार’ (Sachin Pilgaonkar Will Be Honoured be With ‘Gandhar Gaurav Puraskar’)

मराठी व हिंदी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यात बालदिनी, १४ नोव्हेंबरला हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक देण्यात येईल.

कलाक्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दलचा हा पुरस्कार गंधार बालनाट्य संस्था देत असते. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे इत्यादी कलाकारांना या गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सचिन पिळगावकर यांना हा पुरस्कार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून मराठी व हिंदी चित्रसृष्टीत पदार्पण केले होते. यथावकाश किशोरवयीन नायक ते तरुण नायक आणि पुढे निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांनी या क्षेत्रात योगदान दिले. टेलिव्हिजन मालिका व संगीत-नृत्य कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी कामगिरी गाजवली आहे. अलिकडच्या काळात चरित्र अभिनेता म्हणून देखील त्यांनी अदाकारी गाजवली आहे.