रुपाली भोसलेच्या पावसाच्या ...

रुपाली भोसलेच्या पावसाच्या आठवणी (Rupali Bhosale’s Nostalgia About Rainy Season)

सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू. चित्रपट – मालिकांतून अभिनय करणारी कलाकार मंडळीही याला अपवाद नाहीत. अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडीचा ऋतू असून यावर्षी लॉकडाऊनच्या कृपेने सिल्वासा येथेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शूटिंग सुरु असलेल्या सेटवर तिने पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

प्रत्येकालाच हवाहवासा वाटणाऱ्या या पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली सोडत नाही. दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हा तिचा ठरलेला नेम. पण सध्या लॉकडाऊनमुळे तिला हे शक्य झाले नाही. पण आपल्या पावसाच्या आठवणी सांगताना रुपाली म्हणाली की, ती विरारला राहते. त्यांच्या घराच्या बाल्कनीत तिने छोटीशी बाग तयार केलीय. आणि पावसाळ्यात इथला नजारा मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. तसेच याच दरम्यान मोगऱ्याला बहर येतो. या मोगऱ्याचा घरभर पसरणारा सुवास मनमोहित करुन टाकतो, असं ती सांगते.

यंदा तिच्या आईने बागेत काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार म्हणून रुपाली आनंदून गेली आहे. विरारला राहत असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे खूप जवळून अनुभवता येतं, असं ती म्हणते. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे तिला खूप आवडतात. त्यामुळे पाऊस आपल्या खूप जवळचा आहे, असं ती म्हणते.