गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्याच्या आनंदात आलिया भ...

गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्याच्या आनंदात आलिया भट्टकडून आरआरआर टीमसाठी खास ट्रीट (RRR: Alia Bhatt Host Party For Entire Star Cast Of RRR After Winning Golden Globes 2023 )

२०२२ सालातील सर्वाधिक चर्चेत असलेला दाक्षिणात्य चित्रपट, आरआरआर या वर्षीही चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच सलमान खान व इतर सेलिब्रेटी असे सर्वचजण या चित्रपटातील टीमचे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, आता आरआरआर चित्रपटात सहभाग असलेली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या टीमसाठी जंगी पार्टी देणार आहे.

साऊथसोबतच एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात बॉलिवूड स्टार्सही दिसले होते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या दोघांच्या भूमिकाही लोकांना खूप आवडल्या. आलिया भट्टचा हा साऊथचा डेब्यू चित्रपट होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आरआरआरच्या टीमसाठी ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड’ जिंकल्याबद्दल एका पार्टीचे आयोजन करणार असल्याचे समजले आहे. या पार्टीमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दिसणार आहे.

एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवली आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर कोरिओग्राफर प्रेम रक्षितने पडद्यामागच्या बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्यांनी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी ११० स्टेप्स तयार केल्या होत्या. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

गाण्याचं शूटिंग आणि रिटेकबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “हे गाणं शूट करायला २० दिवस लागले आणि ४३ रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण केली होती. याच वीस दिवसांत आम्ही रिहर्सलसुद्धा केलं होतं.”

नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती. सकाळच्या वेळेत रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटाच्या सीन्सचं शूटिंग करायचे. पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता दोघं रिहर्सल करायला जायचे. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचं रिहर्सल सुरू असायचं.

“शूटिंगच्या अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही या गाण्यात बदल करत होतो. राजामौली सरांना काही खटकलं तर आम्ही पुन्हा ती गोष्ट शूट करायचो. गाण्याच्या शेवटपर्यंत माझी अग्निपरीक्षा सुरू होती”, अशा शब्दांत प्रेम रक्षितने अनुभव सांगितला. आज आरआरआर चित्रपटाच्या टीमची मेहनत फळाला आली आहे. तेव्हा पार्टी तो बनती है… असंच म्हणायला हवं.