रितेश-जेनेलिया देशमुख यांनी कलाजीवनाची २० वर्षे...

रितेश-जेनेलिया देशमुख यांनी कलाजीवनाची २० वर्षे पूर्ण केल्याबद्दल कथन केला आपला ‘वेड’ पर्यंतचा प्रवास (Riteish-Genelia Deshmukh Became Nostalgic On Completion Of 20 Years Of Their Acting Career And Celebrated Grand Success Of Their Marathi Film ‘Ved’)

रितेश आणि जेनेलिया देशमुख या कलाकार दांपत्याची घरची निर्मिती असलेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने तिकीट बारीवर विक्रमी यश मिळविले आहे. संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात १० कोटी रुपयांची कमाई केली व चौथ्या दिवशी आणखी ३ कोटींची कमाई करून सगळ्यांना अचंबित केले आहे.

‘वेड’ द्वारे रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले, तर जेनेलियाने आपला पहिला मराठी चित्रपट अभिनेत्री व निर्माती म्हणून दिला. या चित्रपटाचे यश तसेच या जोडप्याने चित्रसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली व त्यांच्या मुंबई फिल्म कंपनी या निर्मितीस १० वर्षे झाली म्हणून या दोघांनी एक आनंद सोहळा आयोजित केला होता.

या प्रसंगी बोलताना रितेशने आपला प्रवास कथन केला. “ ‘तुझे मेरी कसम’ हा आमच्या दोघांचा चित्रपट २० वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. पहिल्या दिवसाच्या शूटिंगला मी देवळाच्या पायऱ्या चढतोय्‌ असे दृश्य चित्रित करण्यात आले. त्याबाबत विचारणा करता, दिग्दर्शक विजय भास्कर व निर्माते रामोजी राव यांनी मला सांगितले की, पहिल्या दृश्यातच तुझे मंदिरात जाऊन देवदर्शनाचे दृश्य चित्रित करणे, म्हणजे तुला देवाचे आशीर्वाद मिळावे, हा आमचा हेतू होता. त्या दिवसापासून सातत्याने आम्हाला देवाचा आशीर्वाद लाभला आहे,” असे सांगून रितेशने ‘तुझे मेरी कसम’ चे निर्माते व दिग्दर्शक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

जेनेलियाने ‘वेड’ची नायिका म्हणून मराठी चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने वेगवेगळ्या ६ भाषांमधील (हिंदी सह) चित्रपटात नायिकेची भूमिका साकार केल्याचे सांगून तिचा पदार्पणातील, प्रत्येक भाषेतील चित्रपट सुपरहिट ठरल्याचे व ती एक सक्षम अभिनेत्री असल्याचे रितेशने सांगितले.

“‘वेड’च्या मुहूर्ताच्या दिवशी मी रितेशला डायरेक्टर्स लेन्स भेट दिले व शुभेच्छा देणारे पत्र लिहिले होते. तसेच आमच्या दोन्ही मुलांनी त्याच्या नावे पत्रे लिहिली होती, असे सांगून जेनेलियाने त्याच्या दिग्दर्शन कौशल्याची प्रशंसा केली.”

“माझी आई किंवा वडील कधीच माझ्या चित्रपटाच्या सेटवर आले नव्हते. म्हणून मी गेल्या वर्षी ७ डिसेंबरला तिच्या वाढदिवशी तिच्या हस्ते ‘वेड’ चा मुहूर्त केला. माझ्या एका मुलाने कॅमेरा ऑन केला व दुसऱ्याने ‘कट्‌’ असा आदेश दिला. हा माझ्यासाठी खास दिवस होता,” असं सांगत रितेशने आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी रितेश – जेनेलिया यांनी केक कापून सोहळा साजरा केला,