कोण आहेत ‘शूटर दीदी’ चंद्रा तोमर, न...

कोण आहेत ‘शूटर दीदी’ चंद्रा तोमर, नेमबाजीमध्ये वयाच्या ६० व्या वर्षी जिंकली अनेक मेडल्स (RIP: Who was Shooter Dadi Chandro Tomar, Who Her Career In Her 60s And Won Many Medals)

‘शूटर दीदी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रा तोमर यांचं काल ३० एप्रिल रोजी करोनाची लागण होऊन निधन झालं आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. चंद्रा तोमर यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांना बिनधास्त जगण्याची, स्वतःची स्वतंत्र ओळख बनवण्याची प्रेरणा देणाऱ्या शूटर दीदी कायम आपल्यासोबत राहणार आहेत. शूटर दादी चंद्रा तोमर यांच्या जीवनाशी निगडीत काही गोष्टी जाणून घेऊयात.

कुटुंबात महिलांसाठी होते कडक निर्बंध

‘शूटर दादी’ यांचा जन्म शामली येथील मखमूलपुर गावात १ जानेवारी १९३२ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जौहडीच्या भंवर सिंह या शेतकऱ्यासोबत त्यांचा विवाह झाला. तेथे त्या एकत्र कुटुंबात राहत होत्या. सासरी गेल्यावर त्यांना महिलांसाठी करण्यात आलेल्या कडक नियमांचं पालन करावं लागलं.

इतर मुलींप्रमाणेच चंद्रा तोमर यांना लहानपणापासूनच घरातील कामे शिकवण्यात आली होती, परंतु विधिलिखीत वेगळंच होतं. स्त्रियांना बिनधास्त आणि पुरुषी वर्चस्व झुकारून स्वतंत्रपणे जगता यावे यासाठीचा मार्ग त्या शोधत होत्या.

खेळाखेळामध्ये शिकल्या नेमबाजी

वयाच्या ज्या टप्प्यावर येऊन व्यक्ती विसावा घेतात, त्या वयात दादींनी जगण्यास सुरुवात केली. वंशपरंपरेने चालत आलेल्या बुरसटलेल्या विचारांवर त्यांनी असा काही निशाणा लावला, की त्यामुळे महिलांसाठी त्या आदर्श ठरल्या. त्याचं झालं असं की, आपली लाडाची लेक शेफाली तोमरला नेमबाजी शिकविण्यासाठी त्या शूटिंग रेंजला घेऊन गेल्या, त्यावेळी त्यांचं वय ६८ वर्षांचं होतं. परंतु शेफाली त्यावेळेस गन पाहून घाबरली. शेफालीची भिती घालवण्याकरिता चंद्रो यांनी स्वतः हातात गन घेतली आणि गोळ्यांवर नेम लावला. त्यांचा नेम बरोबर १० नंबरच्या गोळ्यावर लागला. येथूनच त्यांच्या नेमबाजीच्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली.

तासभर पाण्याचा जग घेऊन केला सराव

आपल्या कुटुंबातील पुरुषांकडून आपल्याला परवानगी मिळणार नाही, हे चंद्रा यांना चांगलंच माहीत होतं. त्यामुळे त्यांनी घरच्यांपासून लपून नेमबाजी शिकण्यास सुरुवात केली. गन अतिशय जड होती आणि एक हात सरळ ठेवून गन पकडावी लागत होती. त्यासाठी हातात ताकद पाहिजे, त्याशिवाय बॅलेन्स करणं कठीण होतं. त्यावरही त्यांनी तोडगा शोधला. हातातील ताकद वाढवण्यासाठी त्या एका जगमध्ये पाणी भरून तासभर तो जग सरळ पकडून उभ्या राहत होत्या. आपल्याला कोणी पाहू नये म्हणून रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर त्यांचा सराव सुरू होता. अशाप्रकारे सराव करता करता चंद्रा तोमर नेमबाजीत तरबेज झाल्या.

पहिल्यांदा वर्तमानपत्रात फोटो आल्यानंतर वर्तमानपत्र लपवलं

त्यानंतर चंद्रा यांनी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच स्पर्धेमध्ये त्यांना चांदीचं पदक मिळालं शिवाय वर्तमानपत्रात फोटोही छापून आला. परंतु घरातील कोणी पाहू नये म्हणून त्यांनी तो पेपरच लपवला. नंतर मात्र धाडस करत त्यांनी सगळ्यांना तो पेपर दाखवला. अशातऱ्हेने आधी घरच्यांना आणि मग गावातील लोकांना त्यांच्या नेमबाजीबद्दल कळलं.

गाववाल्यांकडून निंदा

घरात आणि गावात चंद्रा यांच्या नेमबाजीबद्दल कळल्यानंतर गावातल्या लोकांनी त्यांची निंदानालस्ती सुरू केली. ”नातवंडांना भरवण्याच्या वयात हे काय करतेस… सैन्यदलात जायचं आहे का?” अशाप्रकारची लोकांची बोलणी त्यांना सहन करावी लागली. परंतु लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष नेमबाजीवर केंद्रीत केलं. एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की, ”घरातील सगळ्यांनी मला विरोध केला, परंतु मी कान बंद केले. सहनशक्ती जबरदस्त गोष्ट आहे. एक स्त्री सर्वकाही करू शकते हे मला त्यांना दाखवून द्यायचं होतं. जे लोक माझी निंदा करायचे, नंतर तेच लोक माझे गोडवे गाऊ लागले.”

जाऊबाई प्रकाशीसाठी ठरल्या प्रेरणादायी

चंद्रा यांची जाऊ प्रकाशी देखील कमालीची नेमबाज आहे. चंद्रा यांच्याकडून प्रेरित होऊन त्याही नेमबाजीसाठी जाऊ लागल्या. ‘आवड आणि हिंमत असेल तर वयाची अडचण येत नाही,’ असं त्या म्हणतात. तर नेमबाज चंद्रा म्हणतात, ‘माणसं शरीरीनं वृद्ध होतात, मनाने नाही.’

या दोन्ही नेमबाज आज्यांनी मिळून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बरीच पदके मिळवली आहेत. जौहडी गावातील मुलींना त्या नेमबाजी शिकवतात. या मुलींनीच चंद्रा यांना ‘शूटर दादी’ असं नाव दिलं आहे.

चंद्रा तोमर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘सांड की आँख’

चंद्रा तोमर यांच्या जीवनावर आधारीत ‘सांड की आंख’ या सिनेमात चंद्रा तोमर आणि प्रकाशी तोमर यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. यात चंद्रा तोमर यांची व्यक्तीरेखा अभिनेत्री भूमी पेडणेकरने साकारलीय. तर प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा तापसी पन्नूने साकारली आहे. तुषार हिरानंदानी यांनी ‘सांड की आँख’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

‘शूटर दीदी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रा तोमर ह्या आज हयात नसल्या तरी त्यांचे कार्य सदैव सगळ्यांना प्रेरणा देत राहील. देशातील कानाकोपऱ्यातून त्यांच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नू, भूमि पेडणेकर तसेच अनेक सेलिब्रिटींनी चंद्रा तोमर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलंय.