तबस्सुमकडून प्रेरणा घेऊन करण जोहरने सुरू केलाय्...

तबस्सुमकडून प्रेरणा घेऊन करण जोहरने सुरू केलाय् ‘कॉफी विद करण’ हा कार्यक्रम (RIP Tabassum: Karan Johar wanted to become Tabassum when he grew up, He was inspired by her to start ‘Koffee with Karan’ Read the interesting story)

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर काल रात्री मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम आजही त्यांच्या ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोमुळे चाहत्यांच्या स्मरणात आहेत.

तबस्सुम यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त तबस्सुम यांनी टेलिव्हिजनच्या जगातही खूप नाव कमावले. त्यांचा ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ हा दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय शो होता, जो सलग २१ वर्षे प्रसारित झाला होता. कलाकारांची मुलाखत घेण्याची तबस्सुम यांची अनोखी शैली लोकांना फारच आवडली. चित्रपट निर्माता करण जोहर देखील लहानपणापासून तबस्सुम यांचा चाहता होता आणि त्याने अनेकदा तबस्सुम त्याला प्रेरणास्थानी असल्याचे सांगितले आहे.

अलीकडेच ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये पोहोचलेला करण जोहर याविषयी बोलला. मला लहानपणापासून तबस्सुमजी सारखं व्हायचं होतं, असं तो म्हणाला होता. “मला आठवतं मी दिलीप साहेबांच्या घरी गेलो होतो आणि तबस्सुमजी तिथे हजर होत्या. मला त्यांना भेटायचे होते. एकदा माझ्या वडिलांनी मला विचारले की, तुला काय व्हायचे आहे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की, मला तबस्सुमजी सारखं बनायचं आहे. आता मी तबस्सुमजींसारखा टॉक शो करत आहे. मी कॉफी विद करण करत आहे. त्या खरोखरच प्रतिष्ठित होत्या. ”

करण जोहरने कॉफी विद करणची संकल्पना त्यांचे वडील दिवंगत यश जोहर यांच्यासमोर मांडली असतानाची एक आठवण सांगितली. तो म्हणाला, “वडील हयात होते आणि मी त्यांना माझी कल्पना सांगितली तेव्हा ते म्हणाले, ‘बरं, तू तुझ्या मित्रांना कॉल करशील, त्यांना विचारशील. ते बोलतील आणि लोक बघतील. तुझ्या मित्रांना बोलावण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी कोणी तुला पैसे का देईल?’ त्यांना मला काय सांगायचे होते ते समजलेच नाही. ते म्हणाले, ‘तुला तबस्सुम बनायचे आहे?’

तबस्सुम यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की शुक्रवारी रात्री त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. २१ नोव्हेंबर रोजी तबस्सुमजींसाठी आर्य समाज, सांताक्रूझ, मुंबई येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.