निरोगी राहण्यासाठी पौष्टीक आहार (Right Nutritio...

निरोगी राहण्यासाठी पौष्टीक आहार (Right Nutrition For Healthy Life)

निरोगी राहण्यासाठी पौष्टीक आहार घेणे गरजेचे असते. पण आपल्यापैकी काही जण डाएटिंग किंवा चटपटीत खाण्याच्या नादात ही गोष्ट नजरेआड करतो. तसं होऊ नये म्हणून आम्ही देत आहोत अतिशय सोप्या आणि उत्तम टिप्स. त्याच्या आधारे आपण अधिकतम पोषण मिळवाल आणि निरोगी राहाल. ॲबट न्युट्रिशनचे सायंटिफीक आणि मेडिकल अफेअर्सशी निगडीत डॉ. शेख, हेड ॲडल्ट न्यूट्रिशियन आहेत. त्यांनी ही माहिती पुरवली आहे.

नाश्ता टाळू नका

दिवसाची सुरुवात चांगली होणे व अंगी उर्जा प्राप्त होणे यासाठी नाश्ता करणे गरजेचे असते. एका पाहणीद्वारे असं आढळून आलं आहे की, हा नाश्ता आपल्या शरीरासाठी व हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे उत्तम झोप आणि दिवसाची सुरुवात चांगली करणारा उर्जा स्रोत म्हणून याची गरज असते. सिरीअल्स, अंडी, दूध, संपूर्ण धान्ये, फळे आणि सुकामेवा इत्यादींनी युक्त नाश्ता कधीच टाळू नका.

पौष्टीक पदार्थ घ्या

फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, फॅट नसलेले दुग्धजन्य पदार्थ इत्यादी जिन्नस आपल्या शरीरास इंधन पुरवतात. अंडी, कॉटेज चीज, घेवडा, कडधान्ये आणि बदाम अशा प्रोटीनयुक्त पदार्थांनी शरीरास उत्तम पोषण तत्वे मिळतात. अशा पोषण तत्त्व असलेल्या पदार्थांमुळे उर्जा मिळते. तसेच लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या विकारांवर गुणकारी ठरतात.

देशी खाद्यपदार्थ निवडा

कर्बोदिके, प्रोटिन्स, फॅटस आणि व्हिटॅमिन्स व खनिज द्रव्ये यांच्याने शरीर सशक्त होते. त्यामुळे या सर्वांनी युक्त असलेला संतुलित आहार घ्या. जेणेकरून पोषण तत्त्वांचा अभाव राहणार नाही आणि वाढत्या वयानुसार होणारे आजार घर करणार नाहीत. देशी खाद्यपदार्थ अर्थात्‌ घरगुती स्वयंपाकाचे जेवण घ्या.

भरपूर पाणी प्या

६० टक्के मानवी शरीर पाण्याने व्यापले आहे. ती शरीराची गरज आहे. त्यामुळे हे प्रमाण १ ते २ टक्क्याने जरी कमी झाले तरी थकवा, ग्लानी येऊ लागते. म्हणून दररोज भरपूर पाणी प्या. पाणी जास्त प्या व साखर कमी प्रमाणात घातलेला चहा किंवा दूध, सरबत यांच्या मार्गाने पाणी मिळवा.

भूक लागेल तेव्हा खा

भूक लागण्याचे संकेत शरीर देत असते. तेव्हा कडकडून भूक लागेल याची वाट न पाहता कमी भूक असेल तेव्हा खा आणि पोट भरून न खाता, थोडी जागा ठेवून खा. प्रमाणात खा. कारण कमी खाल किंवा जास्त खाल तरी उर्जेची पातळी घसरेल. भूक लागेल तेव्हा सुकामेवा, फळे आणि चीझ असे पौष्टीक खाद्यपदार्थ प्रमाणात खा. तीन चौरस आहार आणि एक किंवा दोन वेळा खाऊ घेणे हे सर्वाधिक श्रेयस्कर ठरेल.