तान्ह्या बाळांसाठी पूर्वीच्या काळातील लंगोटाचे ...

तान्ह्या बाळांसाठी पूर्वीच्या काळातील लंगोटाचे पुनरागमन (Reusable Langots Are Best Option For Children : Which Were Used In Yesteryears)

पूर्वीच्या काळी तान्ह्या बाळांना पांढरे सुती लंगोट लावले जायचे. बाळाने शी आणि शू केली की, ते लंगोट बदलून स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा त्यांचा वापर केला जायचा. रेडिमेड कपड्यांचा ‘वापरा आणि फेकून द्या’; या पाश्चात्य वृत्तीने आपल्या आयांचा कब्जा घेतला आणि बाळांसाठी डायपर्स वापरण्याचे युग आले. सुती लंगोटापेक्षा खर्चिक असलेले हे डायपर्स सर्वच थरातील मातांना सोयीचे वाटू लागले. अन्‌ आज त्यांना प्रचंड मागणी आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यावर मोठा नफा कमावला.

आता हे डायपर्स सोयीचे वाटत असले तरी काही तान्हुल्यांना त्याची ॲलर्जी होते, इतकेच नव्हे तर या डायपर्सचा वर्षानुवर्षे वापर केल्याने भविष्यात त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दिल्लीच्या टॉक्सिक लिंक्स या संस्थेने असा शोध लावला आहे की, सदर डायपर्सच्या चांगल्या परिणामांसाठी त्यामध्ये पयालेटस्‌ हे टॉक्सिक केमिकल्स वापरण्यात येते. या एकदाच वापरा आणि फेकून द्या, अशा तान्ह्या बाळांच्या व मोठ्या मुलांच्या डायपर्समध्ये असलेल्या या घातक टॉक्सिनमुळे शरीरात निर्माण होत असलेल्या एन्डोक्राइन्‌च्या वाढीमध्ये बाधा येते आणि पुढे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ही माहिती सुपरबॉटम्स्‌ या लहान मुलांची अंतर्वस्त्रे निर्माण करणाऱ्या कंपनीच्या संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी यांनी दिली आहे. त्यांनी पुढे अशीही धक्कादायक माहिती दिली आहे की, ”सतत ३ वर्षं बाळाने डायपर्स वापरले तर ६३५० त्याच्या कामी येतात आणि या डायपर्सचे विघटन होण्यासाठी ५०० वर्षं लागू शकतात.” हा दावा खरा मानला तर हे डिसपोजेबल डायपर्स म्हणजे प्लास्टीकचा, पॉलिथिनचा बाप म्हणायला हवेत. आणि पर्यावरणाचे शत्रू मानले पाहिजेत.

डायपर्सबाबत निव्वळ हा धोक्याचा इशारा देऊन पल्लवी उटागी थांबलेल्या नाहीत तर त्यांनी या घातक वस्तूला पर्याय दिला आहे. त्यांनी सुपरबॉटम्स्‌चे १०० टक्के सुताचा वापर केलेले साधे, सोपे डायपर्स तयार केले आहेत. त्याने बाळाच्या त्वचेला ॲलर्जी होणार नाही, तसेच केमिकल्सचा वापर नसल्याने ते घातक ठरणार नाहीत, असे हे डायपर्स अगदी कोमल आहेत. तसेच आरोग्यदायी आहेत. अन्‌ विशेष म्हणजे डिसपोजेबल डायपर्सपेक्षा ७० टक्क्यांनी स्वस्त पडतात. शिवाय धुवा आणि पुन्हा वापरा, या जुन्या जमान्यातील बाळांच्या लंगोटाप्रमाणे याचा वापर करता येतो. सुती असल्याने पर्यावरणास धोका नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी पांढऱ्या सुती लंगोटांचा जमाना पुन्हा आला असं म्हणायला हरकत नाही.