सर्वांग सौंदर्याचा संकल्प 108 टिप्स (Resolution...

सर्वांग सौंदर्याचा संकल्प 108 टिप्स (Resolution for Complete Beauty)

नववर्षाच्या सुरुवातीचे, काही हिवाळी महिने डोक्यावरील केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सर्वांगाचं सौंदर्य जपण्यासाठी… वधारण्यासाठी काय करता येईल, ते जाणून घेऊ.

नववर्ष म्हणजे नवचैतन्य आणि नवउत्साहाचं जल्लोषमय मिश्रण. या नववर्षाची सुरुवात प्रत्येक जण नव्या उमेदीने नवे संकल्प सोडून करत असतो. व्यक्ती तितके नानाविध संकल्प असतात. कुणाचे वैयक्तिक, कुणाचे आर्थिक, कुणाचे व्यावसायिक, कुणाचे शैक्षणिक, तर कुणाचे सामाजिक! अशा नानाविध संकल्पांच्या साथीने एक संकल्प बहुतांश लोक हमखास सोडतात. हा संकल्प असतो, सौंदर्य जपण्याचा.

सध्या चलतीच प्रेझेंटेशनची आहे. म्हणूनच हल्ली प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही प्रेझेंटेबल असावी लागते, मग वय आणि क्षेत्र कोणतंही असो. आता प्रेझेंटेबल राहायचं म्हणजे, केवळ मेकअप करून वरवरचं चांगलं दिसून उपयोग नाही. त्यासाठी सर्वांगाचं सौंदर्य जपायला हवं. आणि सौंदर्य जपायचं म्हणजे, त्यासाठी नियमितपणे काही नियम पाळायला हवेत. असेच काही नियम टिप्स स्वरूपात आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

जानेवारी महिना म्हणजे हिवाळा ऋतू. अर्थात, नववर्षाची सुरुवात नेहमीच थंडीच्या सोबतीने होते. त्यामुळे वातावरणात गारवा, कोरडेपणा असतो. अशा वातावरणात त्वचा आणि केसही शुष्क होतात. हे टाळून त्वचा-केसाचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी वातावरण आणि पर्यावरण यांस पूरक सौंदर्यसाधना करणं गरजेची आहे. हे ध्यानात घेऊन नववर्षाच्या सुरुवातीचे, काही हिवाळी महिने डोक्यावरील केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सर्वांगाचं सौंदर्य जपण्यासाठी… वधारण्यासाठी काय करता येईल, ते जाणून घेऊ.

केस
1.   धुळीच्या ठिकाणी केस स्कार्फ किंवा शॉवर कॅपने झाका.
2.   चंदन तेलाचा वापर करा.
3.   जास्वंद तेलाने केसाच्या मुळाशी मालीश केल्यास, केसाची वृद्धी होते.
4.   मेंदी आणि दही एकत्र करून तयार केलेला पॅक केसावर लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा.
5.   केसांना गुलाबपाणी लावा.
6.   ऑलिव्ह ऑईल गरम पाण्यात मिसळून लावा.
7.   शाम्पूनंतर कंडिशनर जरूर करा.
8.   खोबरेल तेल कोमट करून केसांच्या मुळाशी चोळा.
9.   केसांच्या मुळाशी गरम तेलाने मालीश करून तासभराची झोप जरूर घ्या. शक्य असल्यास काही सेकंदासाठी डोकं खाली जरूर करा.

डोक्याची त्वचा
1.   नियमितपणे खोबरेल तेलाने मालीश करा.
2.   गरम पाण्यात जास्वंद तेलाचे चार-पाच थेंब मिसळून, त्याने मालीश करा.
3.   कंडिशनर केल्यानंतर केसांच्या मुळाशी स्वच्छ तलम रुमाल जरूर फिरवा.
4.   डोक्याच्या त्वचेवर सुगंधी टाल्कम पावडर 10 मिनिटांसाठी लावून ठेवा.
5.   गरम पाण्यात टर्किश टॉवेल बुडवून, घट्ट पिळा आणि केसांवर बांधा. दोन मिनिटांनंतर पुन्हा गरम पाण्यात बुडवून, घट्ट पिळून केसांवर बांधा. अशा प्रकारे पाच वेळा करा.
6.   सौम्य दाताच्या कंगव्याने दिवसातून तीन वेळा केस विंचरा.
7.   शाम्पूमध्ये सम प्रमाणात पाणी मिसळून नंतर त्याने केस धुवा.
8.   व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करून, आंघोळीपूर्वी डोक्यावर लावा.
9.   साजूक तूप हातावर चोळून, ते केसाच्या मुळाशी लावा.
10.  मागून पुढे, खालून वर आणि दोन्ही बाजूने अशा प्रकारे सर्व दिशेने संपूर्ण केस हलकेच खेचून, डोक्याची त्वचा वर उचलत मालीश करा.

कपाळ
1.   मसूर डाळीच्या पिठाचा लेप लावा.
2.   डोक्याला लावलेलं तेल कपाळावर ओघळल्यास, त्वरित साबण लावून स्वच्छ करा.
3.   दूध आणि गुलाब पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा.
4.   कपाळावरील ब्लॅकहेड्स काढल्यानंतर, त्या ठिकाणी त्वरित टाल्कम पावडर लावा.
5.   मुलतानी माती दुधात भिजवून कपाळावर लावा.
6.   कपाळावर दही आणि बेसन यांचा पॅक लावा.
7.   रवा, साखर आणि दही सम प्रमाणात एकत्र करून कपाळावर चोळा.
8.   कपाळावर काकडीच्या चकत्या ठेवा.
9.   जायफळ दुधात उगाळून कपाळावर लावा.
10.  रात्री झोपण्यापूर्वी टाल्कम पावडर पाण्यात भिजवून कपाळावर लावा.

डोळे
1.   सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
2.   काकडीचा रस लावा.
3.   चष्मा, लेन्स हलक्या दर्जाचा वापरू नका.
4.   इअरबडच्या मदतीने भुवया, पापण्या स्वच्छ करा.
5.   गावठी गुलाबाच्या पाकळ्या डोळे मिटून पापण्यांवर ठेवा.
6.   मॅग्नेट बेस आय मास्क शक्यतो वापरू नका.
7.   आयब्रो केल्यानंतर डोळ्यांवर केवळ थंड पाणी लावा.
8.   शक्यतो फॅशनसाठी गॉगलचा वापर करू नका.
9.   सकाळी त्राटक केल्यास डोळ्यांसाठी बलदायी ठरतं.
10.  डोळ्यांवर साय जरूर लावा.

नाक
1.   इअरबडच्या मदतीने नाकाचे कोपरे स्वच्छ करा.
2.   दही आणि साखर समप्रमाणात घेऊन, नाकावर चोळा.
3.   कोमट खोबरेल तेल नाकावर लावा.
4.   ब्लॅकहेड्स असल्यास स्क्रब फेस वॉशचा वापर करा.
5.   नाकावर टाल्कम पावडर लावा.
6.   गुलाब पाणी आणि बदाम पूड एकत्र करून नाकावर लावा.
7.   नाकाच्या त्वचेवर कोबीची पानं चोळा.
8.   जोजोबा तेलात पाणी मिसळून नाकावर लावा.
9.   वेट आणि ड्राय टिश्यूच्या साहाय्याने नाक स्वच्छ करा.
10.  टूथपिकचा वापर करून नाकाची त्वचा स्वच्छ करा.

गाल
1.   चंदन, मुलतानी माती आणि दही यांचा मास्क तयार करून गालावर लावा.
2.   बिटाचा रस आणि साय एकत्र करून मास्क तयार करा.
3.   रक्त चंदन आणि दूध यांचा मास्क लावा.
4.   हळद आणि लिंबाचा रस यांचा मास्क 3 मिनिटांसाठी गालावर लावा.
5.   स्ट्रॉबेरी दह्यात मिसळून गालावर लावा.
6.   केळ्याची सालं त्वचेवर चोळा.
7.   केशर काडी आणि साखर दुधात मिसळून लावा.
8.   जायफळ दह्यात वाटून लावा.
9.   बेसन ताकात पाच तास भिजत ठेवा. नंतर त्वचेवर लावा.
10.  कोको बटर मॉइश्‍चरायझर जरूर लावा.

गळा
1.   साखर आणि लिंबाचा रस गरम करून गळ्यावर लावा.
2.   हळद आणि ताक एकत्र करून गळ्यावर लावा.
3.   शिया बटर मॉइश्‍चरायझर गळ्याला लावा.
4.   गरम पाण्यात बुडवलेला टर्किशचा टॉवेल गळ्याभोवती अलगद गुंडाळा.
5.   गळ्यावर रेघा येत असल्यास, रोजमेरी ऑईल लावून अलगद मालीश करा.
6.   आंघोळीनंतर गळा पुसून कोरडा करून घ्या. त्यानंतर गळ्यावर टाल्कम पावडर लावा.
7.   गळ्यावर काकडीची सालं चोळा.
8.   गळ्यावर द्राक्षाचा गर चोळा.
9.   दही आणि गुलाबाची पूड एकत्र करून गळ्यावर लावा.
10.  रोजमेरी ऑईल कोमट करून त्याने गळ्यावर मालीश करा.

मान
1.   संत्र्याची पूड ताकात भिजवून मानेवर लावा.
2.   स्क्रब साबणाने मान हळुवार चोळा.
3. ताकात लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणात रुमाल बुडवून मानेवर ठेवा.
4. त्वचेवर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
5. मानेवर ग्लिसरीनयुक्त पाण्याचा स्प्रे मारा.
6. लेमन-ट्री ऑईल लावून मानेला मालीश करा.
7. मानेवर चंदन तेल लावा.
8. टाल्कम पावडर पाण्यात कालवून, मानेवर त्याचा लेप लावा.
9.   दूध आणि रक्तचंदन एकत्र करून मानेवर लावा.
10.  मानेवर काकडीचा रस तेलात मिसळून लावा.

हात
1.   ग्लिसरीन आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करून लावा.
2.   कोको बटर मॉइश्‍चरायझर त्वचेवर लावा.
3.   ऑईल बेस्ड साबणाचा वापर करा.
4.   आठवड्यातून एकदा अँटीसेप्टिक साबणाचा वापर करा.
5.   कोणत्याही सामान्य तेलात (खोबरेल तेल इत्यादी) कोको ऑईल मिसळून, त्याने मालीश करा.
6.   आंघोळ करताना त्वचेवर स्क्रब साबण हळुवार गोलाकार फिरवा.
7.   त्वचेवर मड मास्क लावा.
8.   मॉइश्‍चरायझर लावण्यापूर्वी आणि लावल्यानंतर त्वचा कोरडी करा.
9.   साजूक तुपात वेलची मिसळून त्वचेवर चोळा.
10.  साखर-पाणी त्वचेवर घासा.

पाय
1.   साय आणि साखर सम प्रमाणात घेऊन त्वचेवर चोळा.
2.   पायांवर शिया बटरयुक्त क्रीम लावा.
3.   तूप आणि साखर एकत्र करून त्वचेवर लावा.
4.   दह्यामध्ये चंदन कालवून त्वचेवर लावा.
5.   पायाची बोटं कोरडी ठेवा.
6.   पायाच्या बोटांच्या मध्ये कापसाचे बोळे ठेवा.
7.   आंबेहळद तेलात उगाळून लावा.
8.   मसूर डाळीची पूड ताकात वाटून लावा.
9.   इअरबडचा वापर करून नखं स्वच्छ करा.
10.  मांड्या, ढोपर आणि टाच यांवर स्ट्रॉबेरी पल्प चोळा.