‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मध्ये द्वार...

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मध्ये द्वारकाबाईंच्या भूमिकेत आता रेशम टिपणीस (Resham Tipnis To Play The Role Of Dwarakabai In The Hisrorical Serial ‘Ahilyabai’)

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या भव्य ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेत राणी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र उलगडून दाखविले आहे. आपल्या सुजाण कारभाराने त्यांनी आपल्या राज्यात शांती आणि समृद्धी कशी प्रस्थापित केली आणि माणूस जन्माने नाही तर कर्तृत्त्वाने कसा मोठा असतो हे दाखवले आहे. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याने अहिल्याबाईंनी समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिले आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी असामान्य योगदान दिले. त्यांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर अनेक भावी पिढ्यांसाठी त्या प्रेरणामूर्ती बनल्या. एतशा संझगिरी, राजेश शृंगारपुरे आणि गौरव अमलानी अभिनीत ही मालिका 8 वर्षांची झेप घेणार आहे. संस्कारांचे सिंचन करणाऱ्या मातेपासून ते जीवनदात्री मातोश्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास असेल.

या मालिकेत लीपनंतर द्वारकाबाईची भूमिका करण्याची जबाबदारी आता सुखदा खांडकेकरकडून प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्याकडे जाणार आहे. मल्हारराव होळकरांची दुसरी पत्नी असल्याने द्वारकाबाईला नेहमीच असुरक्षित वाटत असे. खंडेराव तिला आवडत असला तरी मल्हाररावांच्या पश्चात तो राजा व्हावा हे तिला पटत नव्हते. ती चुकीचे वागण्यासाठी त्याचे कान भरत असे, जेणे करून तिचा मुलगा गुणोजी याला राज्य मिळावे. पण अहिल्या त्यांच्या जीवनात आल्यानंतर तिची असुरक्षितता आणखीनच वाढली आणि तिच्या विरोधात ती लोकांच्या मनात विष भरवू लागली. खंडेराव आणि अहिल्येत बेबनाव व्हावा यासाठी तिने खंडेरावाला पार्वतीशी लग्न करण्यास भाग पाडले. लीपनंतर प्रेक्षक बघतील की, द्वारकाबाई अहिल्याबाईच्या जीवनात अडथळे उभे करण्याचे कट चालूच ठेवते.

या मालिकेत सहभागी होण्याचा आपला आनंद व्यक्त करताना रेशम टिपणीस म्हणाली, “मी मराठी असल्याने मी लहानपणापासून अहिल्या बाईंच्या उदात्त सामाजिक कार्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्या खरोखर प्रेरणामूर्ती आहेत. प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या आणि या महान सम्राज्ञीचे जीवन चरित्र सादर करणाऱ्या मालिकेत दाखल होताना मला खूप आनंद होत आहे. अहिल्याबाईंची प्रतिभा आणि क्रांतिकारी विचार यांच्या अगदी विरुद्ध अशी द्वारकाबाईची भूमिका मी करत आहे. ती अशी खलनायिका नाहीये पण असुरक्षिततेमुळे तिच्यात नकारात्मकता वाढली आहे. तिचे व्यक्तिमत्व ठसठशीत आहे आणि त्यात अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे ती एक वेधक व्यक्तिरेखा आहे, म्हणूनच मला ही भूमिका करावीशी वाटली, कारण ती आकर्षक आणि वेगळी आहे. लीपनंतर तिच्या स्वभावातली ही नकारात्मकता वाढलेली प्रेक्षकांना दिसेल. तिच्यामुळे कहाणीत अनेक वळणे येतील. या प्रवासाची मी आतुरतेने वाट बघत आहे.”