पैशांची हाव असणाऱ्या वकीलाच्या भूमिकेत रेशम टिप...

पैशांची हाव असणाऱ्या वकीलाच्या भूमिकेत रेशम टिपणीस (Resham Tipnis To Play Greedy Lawyer’s Role)

स्टार प्रवाह वाहिनीवर अबोली ही नवी मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गौरी कुलकर्णी, सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव इत्यादी एकापेक्षा एक सरस कलाकारांच्या सहभागामुळे लवकरच ही मालिका दर्शकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

सोनियाच्या खुनाच्या तपासात इन्सपेक्टर अंकुश आणि अबोली एकत्र लढत आहेत. या तपासात अबोली ही महत्त्वाची साक्षीदार आहे. त्यामुळे सोनियाचा खुनी अर्थातच विश्वासची अटक ही निश्चित झालीय. यातून पळवाट शोधण्यासाठी आता विश्वासने एका वकिलाची मदत घेण्याचं ठरवलं आहे. विजया राजाध्यक्ष असं या वकिलाचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

अबोली मालिकेतील या व्यक्तिरेखेविषयी सांगताना रेशम टिपणीस म्हणाल्या, ‘अबोली मालिकेच्या निमित्ताने मी खूप दिवसांनंतर मराठी मालिकेत काम करतेय. जेव्हा या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा हे पात्र मला खूप आवडलं त्यामुळे मी लगेच होकार दिला. विजया राजाध्यक्ष पेशाने वकिल आहे. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. कोणतीही केस लढवताना पैसे मिळवणं हा एकच हेतू तिच्या मनात असतो. विजयाच्या एण्ट्रीने मालिकेत निश्चितच नवं नाट्य पाहायला मिळणार आहे.’ रेशम टिपणीसने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर देखील ही बातमी पोस्ट केली आहे. त्यात तिने तुम्हाला काही वेगळं पाहायला मिळणार आहे, असं म्हटलं आहे.