सातारा जिल्ह्यातील अंबवडे बुद्रुक गावात, शिवकाल...

सातारा जिल्ह्यातील अंबवडे बुद्रुक गावात, शिवकालीन किल्ले उभारण्याची परंपरा कायम (Replicas Of Shivaji Maharaj Era Forts Are Made In Small Village Of Satara District)

दिवाळीमध्ये आकाश कंदिल, पणत्या, रांगोळी आणि फराळ यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले बनविण्याची परंपरा आपल्याकडे आहे. दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले व शिवप्रेमी तरुण अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती आपल्या घराच्या अंगणात, चाळीच्या आवारात, सोसायटीच्या परिसरात बनवतात.

अलिकडे शहरातून ही प्रथा कमी प्रमाणात पाळलेली दिसत असली तरी गावांकडे ती अद्यापही जोपासली जाते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अंबवडे बुद्रुक हे गाव अग्रस्थानी आहे.

अंबवडे गावातील बालगोपाल गेल्या १० वर्षांपासून शिवकालाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास जागवत आहेत. त्यामुळेच परळी खोऱ्यातील, हे गाव, आता किल्ल्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

आपली ही परंपरा कायम ठेवत अंबवडे गावी यंदाच्या दिवाळीत ४२ किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. यामध्ये राजगड, देवगिरी, विशाळगड, प्रतापगड, पन्हाळा, अजिंक्यतारा, सिंधुदुर्ग, जंजिरा, साल्हेर या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्या. माती, शेण, राख, भुसा, दगड, विटा आणि रंग यांच्या सहाय्याने हे किल्ले बनविले जातात.

अंबवडे गावात हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील लोक येतात. त्यामुळे या गावात ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप असते.