‘जो राम का नही वो किसी काम का नही’, पाकिस्तानमध...

‘जो राम का नही वो किसी काम का नही’, पाकिस्तानमधून धमकी देणाऱ्यांना राजू श्रीवास्तवने दिलेले चोख उत्तर(Remembering Raju Srivastav: ‘Jo Ram Ka Nahi, Wo Kisi Kaam Ka Nahi’, When comedian received threatening calls from Pakistan And Comedian Replied In Strong Words)

राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकजण त्यांना श्रद्धांजली देत आहेत. गेल्या ४१ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत असलेले राजू श्रीवास्तव यांचे काल निधन झाले. आयुष्यभर सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव यांनी जाता जाता मात्र सर्वांना रडवले.  राजू यांचे चाहते आता त्यांच्या कॉमेडीचे जुने व्हिडिओ शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

 पडद्यावर आणि रंगमंचावर लोकांना हसवणारे राजू श्रीवास्तव स्पष्टवक्ते आणि निर्भीड होते. अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानच्या धमक्यांनाही ते कधी घाबरले नाहीत. त्यांच्या धमक्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तरही दिले होते.

राजू आपल्या विनोदांनी अनेकदा राजकारण्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांची खिल्ली उडवायचे. त्यांनी अनेक मोठ्या मुद्द्यांवर विनोदांच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले होते. ते केवळ भारतच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान ते अगदी अंडरवर्ल्ड डॉनचीही खिल्ली उडवायचे. पण पाकिस्तान आणि अंडरवर्ल्डला त्यांची खिल्ली उडवणे अजिबात आवडले नाही. त्यासाठी राजूला धमक्याही मिळायच्या, पण या धमक्यांना घाबरून त्यांनी आपली विनोदाची शैली कधीच बदलली नाही.

गेल्या वर्षी १९ जून २०२१ ला राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांच्या मोबाइलवर पाकिस्तानमधून व्हॉट्सअॅप कॉल आला होता, त्यात राजू श्रीवास्तव यांना शिवीगाळ करण्यात आली होती. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण त्यावेळी घाबरण्याऐवजी राजू श्रीवास्तव यांनी व्हिडिओ संदेश देऊन पाकिस्तानलाच इशारा दिला होता.

राजू श्रीवास्तव यांनी व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले की, आजकाल मला पाकिस्तानकडून धमक्या येत आहेत. समोरुन मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच अपशब्दही वापरत आहे. पण या धमक्यांना मी घाबरणार नाही. मी हिंदु राष्ट्रात जन्म घेतला आहे आणि मला हिंदुत्वाचा सदैव अभिमान राहील. मी पुन्हा पुन्हा म्हणीन की, जो राम का नही वो किसी काम का नही.

राजू श्रीवास्तव यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या होत्या. 2020 मध्येही राजू यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांच्या मोबाईल फोनवरून राजू श्रीवास्तव यांना पाकिस्तानमधून व्हॉट्सअॅप कॉलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना हिंदुत्वाचा मार्ग सोडण्यास सांगितले होते. यानंतर राजू श्रीवास्तव यांनी एफआयआर दाखल केला होता.

2016 मध्ये राजू श्रीवास्तव आणि त्यांचे सेक्रेटरी राजेश यांना मोबाईल आणि लँडलाईनवर धमकीचे संदेश आले होते. तसेच त्यांना फोनवर धमकावले जात होते की, जर तुम्ही दाऊदची चेष्टा कराल, पाकिस्तान आणि त्यांच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवाल तर आम्ही तुम्हाला मारून टाकू.  जेव्हा सतत कॉल आणि मेसेज येऊ लागले, तेव्हा राजू श्रीवास्तव यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांचे संरक्षणही मिळाले.

 आज राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी आणि चाहत्यांनी आपल्या लाडक्या विनोदी कलाकाराचा निरोप घेतला. काही लोकांनी राजू श्रीवास्तव अमर रहेच्या घोषणाही दिल्या. सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव जरी कायमचे नि:शब्द झाले असले तरी ते आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत असतील.