करोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक : थोपवण्यासाठी...

करोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक : थोपवण्यासाठी उपाययोजना (Remedies To Prevent Corona In Children During Third Wave)

करोनाची तिसरी लाट बहुधा याच महिन्याच्या अखेरीस येण्याची दाट शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. आणि ती मुख्यतः लहान मुलांसाठी घातक असल्याचे त्यांचे भाकित आहे.

मुंबईपुरता विचार करायचा झाला तर आतापावेतो लहान मुलांना या रोगाचा संसर्ग बऱ्यापैकी झालेला आढळतो आहे. नऊ वर्षांच्या आतील सुमारे ११ हजार बालकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १७ बालकांचा तर मृत्यू झाला आहे. तर १० ते २० वर्षे वयोगटातील मुले व किशोरवयीन २८ हजार बाधित झाले आहेत. त्यातील ३३ जण मृत्युमुखी पडले आहेत. हे आकडे तिसऱ्या लाटेत वाढण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता लहान मुलांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने तयारी  चालवली आहे. निश्चित उपाययोजना सुचविण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा कृतिगट स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच केली. त्याचबरोबर करोना बाधित मुलांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी वेगळा कक्ष उभारण्यात येईल. तसेच पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर आणि प्राणवायू यांची तजवीज करून ठेवण्यात येत आहे.

सदर कृतिदलाच्या मदतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी आरंभली असून मुलांच्या उपचारासाठी नवा ॲक्शन प्लॅन आखण्यात येत आहे. त्यासाठी जम्बो करोना केंद्र उभारण्यात येत आहेत. ज्यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवला जाईल. बालरोग तज्ज्ञांची या कक्षात नेमणूक करण्यात येईल व त्यांच्या देखरेखीखाली मुलांवर उपचार करण्यात येतील. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे ५०० खाटांचे स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येईल. शिवाय ६ हजार खाटांची ३ स्वतंत्र जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येतील.

बाधित लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन या केंद्राची व्यवस्था लावली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही जम्बो केंद्रे तयार होतील, असे पालिका प्रशासनाला वाटते. या कामासाठी महानायक अमिताभ बच्चनने १ कोटी रुपये देणगी दिली असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.