देवीची शक्तिपीठे: श्री क्षेत्र वनी चे सप्तशृंगी...

देवीची शक्तिपीठे: श्री क्षेत्र वनी चे सप्तशृंगी देवी (Religious Importance Of Saptashringi Devi Established In Hill)

देवीची शक्तिपीठे श्री क्षेत्र वनी चे सप्तशृंगी देवी


देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, मंदिर सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम नव्याने येथे करण्यात आलेले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. येथे नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इत्यादी महत्त्वाची पवित्र तीर्थस्थळे आहेत. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रौत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन हे उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर मातेचे मंदिर आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून शेंदूर आणि लेपलेली आहे.