मुंबईतील श्री स्वामी नारायण मंदिराचा परिसर बनला...

मुंबईतील श्री स्वामी नारायण मंदिराचा परिसर बनला कोविडचं इस्पितळ (Religious Bodies Are Coming Forward To Help In The War Against The Corona, Sri Swami Narayan Temple Of Mumbai Has Converted Itself Into A Covid Hospital)

करोनाच्या संकटाशी संपूर्ण देश लढत असताना धार्मिक स्थळंही या लढाईमध्ये मदतीसाठी पुढे येत आहेत. मुंबईतील श्री स्वामी नारायण मंदिराचा परिसर हा कोविडच्या रुग्णांच्या उपचारासाठी इस्पितळात परावर्तित केला गेला आहे. या मंदिरांच्या इमारतींमध्ये देशातील सर्व धर्मीय लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या देशातील नागरिकांचे देखील उपचार सुरू आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशभर रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, या रुग्णांना बीएमसीच्या प्रमुख इस्पितळांमध्ये बेड मिळणं म्हणजे एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा परिस्थितीत मानवाच्या कल्याणासाठी आपली नैतिक जबाबदारी समजून काही धार्मिक स्थळं मदतीसाठी पुढे येत आहेत. करोना विषाणूच्या अतिशय कठीण अशा परिस्थितीत मानवता हाच खरा धर्म असा संदेश या धार्मिक स्थळांकडून दिला जात आहे.

करोनाला लवकरात लवकर घालवून देण्याच्या लढाईत आता संपूर्ण देशातून अनेक धार्मिक स्थळं पुढे येत आहेत. नोएडाच्या सेक्टर १८ येथील गुरुद्वारा साहिब यांनी हल्लीच, करोनाग्रस्त व्यक्तींना तसेच जे घरी जेवण बनवू शकत नाहीत अशांना मदत म्हणून मोफत जेवण पोहचवण्याचे ठरवले आहे. तर वडोदरा येथील स्वामी नारायण मंदिरामध्ये ५०० बेडची सोय करण्यात आली आहे.

मंदिरांसोबतच देशातील मशिदींमधूनही मदतीसाठी हात पुढे सरसावत आहेत. बातमीनुसार वडोदरा येथील जहांगीरपुरा मशिदीस मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोविड सेंटर बनवले आहे. या मशिदीत जवळपास ५० बेड ऑक्सिजनसह उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त दारूल उलूममधेही करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी १२० बेडची सोय करण्यात आली आहे.

देशभरातील धार्मिक स्थळांकडून मिळणारं सहकार्य हे मानवतेचं प्रतीक आहे. कोणत्याही जाती-धर्माचा भेद न मानता करोनावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रयत्न केले जात आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. लवकरच या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा बाळगूया.