वडाचे नि माणसाचे नाते जन्मोजन्मीचे (Religious A...

वडाचे नि माणसाचे नाते जन्मोजन्मीचे (Religious And Scientific Importance Of Banyan Tree On The Occassion Of Vatasavitri)

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं वेगळं महत्व आहे. वट पौर्णिमा या सणाचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व खूप वेगळं आहे. आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेने भारतीय महिला उपवास करतात. सोबतच निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजाही करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. तसेच एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही, म्हणूनच वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजचा करण्याची प्रथा भारतीय भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.

भूतलावरील अनेक घटनांचा साक्षीदार वटवृक्ष

वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणाऱ्या वडाचे आणि माणसाचे नाते जन्मोजन्मीचे असते. जन्मोजन्मीचे यासाठी की इतके आयुष्य ना माणसाचे असते ना अन्य कुठल्या वृक्षाचे. त्यामुळे भूतलावरील अनेक घटनांचा साक्षीदार वटवृक्ष असतो. प्रत्येक गावात वडाच्या पाराशी अनेकांच्या आठवणी जुळलेल्या असतात.

वडाचे धार्मिक महत्त्व कोणी मान्य करो की न करो, मात्र त्याची आधार वाटणारी गर्द सावली आणि त्याचे औषधी उपयोग व पर्यावरणाच्यादृष्टीने असलेली उपयुक्तता यामुळे माणूस अणि वड याचे घट्ट नाते झाले आहे. वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातूनसुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे

म्हणूनच वटपौर्णिमेच्या व्रताच्या निमित्ताने अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी वटवृक्षाला प्रार्थना करतात.

पारंपरिक कथा

पारंपरिक कथेनुसार भद्र देशातील अश्वपती राजाने आपली मुलगी सावित्री उपवर झाल्यावर तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. या कथेकडे वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर, घेरी आलेल्या सत्यवानाचे प्राण यमाने नाही, तर वडाच्या झाडामुळे मिळालेल्या प्राणवायूने परत मिळाले असं म्हणावयास वाव आहे. कारण वटवृक्षाचं महात्म्यच तसं आहे. सध्या सुरु असलेल्या करोना महामारीतून मुक्ततेसाठी सगळ्यांनी एकतरी वड लावावा, असा जणू फतवा निघाला होता, तो याच कारणामुळे.