या नात्याला काय नाव द्यावं? (Relationship more ...

या नात्याला काय नाव द्यावं? (Relationship more than Love and Friendship)

एखादं नातं असं असतं की, ज्यास आपण प्रेमही म्हणू शकत नाही अन् मैत्रीही. प्रेमापेक्षा कमी आणि मैत्रीपेक्षा जास्त असं ते नातं असतं. या नात्याला आपण नाव देऊ शकत नाही, परंतु मनानं आपण ते नातं स्वीकारलेलं असतं.
मनुष्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यास जे काही मिळत नाही, तेच मिळविण्याचा तो प्रयत्न करत असतो. प्रेमाच्या बाबतीत हे सर्रास घडताना दिसतं. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपल्या लाइफ पार्टनरकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्या नात्याच्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडे ओढली जाते. मग त्या व्यक्तीसोबत ती आपलं सुख-दुःखं शेअर करायला लागते. पुढे पुढे ह्या नव्या नात्याची सवय होऊ लागते. कळत-नकळत हे नातं वाढत असतं. मनाला पटलेलं, मनातलं मोकळेपणानं सांगणारं असं मनानं ‘मानलेलं नातं’.

का बनतात अशी नाती?
काउन्सलिंग सायकॉलॉजिस्ट डॉ. माधवी सेठ यांचं असं म्हणणं आहे की, बहुत करून विवाहबाह्य किंवा इमोशनल नाती ही चाळिशीनंतर होताना दिसतात. या वयामध्ये येईपर्यंत व्यक्तीने आपल्या शिक्षण, करिअर, लग्न, मूल अशा सगळ्या जबाबदार्‍या पार पाडलेल्या असतात. आणि आता त्यांच्या आयुष्यात एकप्रकारचा रिकामेपणा (एमटी नेस्ट सिंड्रोम) आलेला असतो. आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपापल्या कामात व्यग्र आहेत, आपल्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही अशा समजुतीने या व्यक्ती मग आपल्यासारख्या दुसर्‍या व्यक्तीशी जोडल्या जातात. ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं, जिच्याशी बोलणं त्यांना सुखावह वाटू लागतं. हे नातं मैत्रीपेक्षा अधिक असतं. कारण त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं. तिच्याशी बोलावंसं वाटतं. परंतु ते प्रेम नसतं, कारण त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारचं शारीरिक आकर्षण या नात्यात नसतं. या व्यक्ती काही वेळेकरिता एकत्र येतात, त्यांना एकमेकांसोबत आयुष्य वगैरे काढण्याची बिलकूल इच्छा नसते. हे नातं मुद्दाम निर्माण केलेलं नसतं. मग काय कारणं असतात अशी नाती निर्माण होण्यामागे…
–    वैवाहिक जीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. नवरा वाईट असेलच असे नाही, तरीही काही वेळा त्याच्यासोबतच्या काही कडू आठवणी दोहोंच्याही मनात असतात. यामुळे वैवाहिक जीवनात रस राहत नाही. अशा परिस्थितीत मन दुसरीकडे जाऊ शकतं.
–    लग्नानंतर काही स्त्रिया या आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे फार दुर्लक्ष करतात. आता लग्न तर झालं मग आता नटून-थटून काय करायचं? असा विचार त्या करत असतात. त्यामुळे नवर्‍यांचं त्यांच्यावरील प्रेम हळूहळू कमी होत जातं आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सौंदर्याकडे ते आकर्षिले जातात.

–    काही जोडपी तर अशी असतात की वरवर ती असं भासवतात ती त्यांच्या नात्यामध्ये सर्वकाही ‘ओके’ आहे. परंतु तसं नसतं. उलट त्या दोघांनीही आपापला मार्ग शोधून त्या त्या जीवनात ते आनंदी असतात.
–    वयाच्या चाळिशीनंतर बरेचदा बायकांना असं वाटू लागतं की घरातील लोकांना आपली आता गरज उरलेली नाही. आपली कोणाला फिकीर नाही. अशा वेळी त्या स्वतःला फार एकाकी समजू लागतात. आणि मग जी व्यक्ती त्यांना समजून घेऊ लागते, अशा व्यक्तीबद्दल त्यांना आपलेपणा वाटू लागतो.
–    लग्नानंतर एकमेकांचे स्वभाव जसजसे कळू लागतात तसतसे नवरा-बायकोंमध्ये वाद होऊ लागतात. अशा वेळी घरच्या जबाबदार्‍या सांभाळण्याबरोबरच काही व्यक्ती अशा प्रकारच्या भावनिक नात्यामध्ये आपले सुख शोधतात.
–   बरीच वर्षे एकाच ठिकाणी काम करून कलीगसोबत एक जवळीक निर्माण होते. आपापल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगणं, अडचणी सांगणं त्यातून मार्ग काढणं. या सगळ्यातून नकळत ही जवळीक निर्माण झालेली असते.

इमोशनल अफेअर्सचे साइड इफेक्ट्स
–    आपण आपल्या जोडीदारास फसवत आहोत की काय अशा प्रकारची अपराधीपणाची भावना मनात सलत राहते.
–  कळत-नकळत जोडीदार तसेच कुटुंबातील व्यक्तींसमोर जाण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला जातो.
– या व्यक्ती स्वतःच्याच काल्पनिक दुनियेत वावरतात, ज्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.
– आपली प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला न सांगता दुसर्‍या व्यक्तीला सांगितली जाते.
–  आपल्या कुटुंबासाठी द्यायचा वेळ त्या व्यक्तीसाठी दिला जातो.
–  त्या व्यक्तीला भेटण्यासाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं.
–  थोड्या वेळेच्या भेटीमध्ये सुख वाटतं, परंतु घरी जेव्हा याबद्दल कळतं त्यावेळेस खरी नाती विस्कटतात.

विचार करा…
प्रायव्हेट लंच डेट्स, सीक्रेट मिटिंग्स, उत्तेजक बोलणं… आपला जोडीदार असताना या गोष्टी जेव्हा दुसर्‍याच व्यक्तीसोबत केल्या जातात त्यावेळेस या नात्याला काय नाव द्यायचं? आपल्यात शारीरिक संबंध नाहीत म्हणजेच आपलं अफेअर नाही अशी त्यांची गोड समजूत असते. परंतु तसं नसतं. जे नातं तुम्ही तुमच्या जोडीदारापासून तसंच दुनियेपासून लपवून ठेवता, त्यास आपली वैयक्तिक बाब मानता तेव्हा खरोखरच हे प्रेमच असतं असं नाही का वाटत? अशा नात्यांमधील जेव्हा सत्य बाहेर येतं त्यावेळेस नवरा-बायकोच्या नाजूक नात्यातील विश्‍वासाला तडा जातो आणि मग ते नातं नावापुरतं राहतं अथवा तेवढंही राहत नाही.