‘माझ्या संपत्तीमध्ये रेखाला वाटा मिळणार न...

‘माझ्या संपत्तीमध्ये रेखाला वाटा मिळणार नाही’ : आत्महत्या पत्रात तिच्या नवऱ्याने आणखी काय लिहून ठेवले…( Rekha Won’t Get Anything From My Property, Know What Her Husband Mukesh Agarwal Wrote In His Suicide Letter)

रेखा ही एक आख्यायिका बनून राहिली आहे… तिच्या खासगी जीवनात मोठ्या प्रमाणात डोकावून पाहिलं गेलं आहे. तिचं खासगी जीवन सगळ्यात जास्त चर्चिलं गेलं आहे. कारण तिचं खासगी जीवन, तिचे पुरुषांशी आलेले संबंध आजही गूढ राहिले आहेत. रेखा बरेच वेळा प्रेमात पडली, पण त्यात यश मिळालं नाही. तिने लग्नं केलीत, पण ती एकटीच राहिली. तिने मुकेश अग्रवाल या बिझनेसमनशी लग्न केलं होतं. पण त्याने आत्महत्या केली, अन्‌ रेखावर अनेक आरोप केले गेले. त्याने आपल्या आत्महत्या पत्रात रेखाचा उल्लेख केला होता. त्यात त्याने काय लिहिलं होतं नि त्यांचे संबंध कसे जुळले व बिघडले ते जाणून घेऊया.

रेखा आणि मुकेश अग्रवाल यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि महिन्याभरातच त्यांनी लग्न केले. १९९० साली मुंबईच्या एका मंदिरात त्यांनी हे लग्न केले.

या दोघांनी घाईघाईत लग्न केले, पण लवकरच त्यांचे संबंध संपुष्टात आले. ६ महिन्यातच त्यांनी घटस्फोट घेतला. असं म्हटलं जातं की आपला बिझनेस वाढविण्यासाठी मुकेश तिचं नाव आणि चेहरा वापरू इच्छित होते. पण रेखाला ते मंजूर नव्हतं. तुमच्या बिझनेसमध्ये मला गुंतवू नका, असं रेखानं त्यांना समजावलं. पण ते ऐकत नव्हते. त्यामुळे वैतागून जात रेखाने त्यांच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. बिझनेसमध्ये ताणतणाव अनुभवणाऱ्या मुकेश यांना रेखाशी काडीमोड झाल्याने आणखीनच गर्तेत टाकले. अन्‌ घटस्फोटानंतर काही महिन्यांनी त्यांनी आपल्या फार्म हाऊसवर रेखाच्याच दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रत्यक्षात तो दुपट्टा रेखाचाच होता की काय, याबाबत पुढे अधिकृतरित्या काहीच कळलं नाही. पण मुकेशच्या आत्महत्येला रेखालाच जबाबदार धरण्यात आलं. तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले.

मुकेश अग्रवालने मरताना एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की, मी रेखासाठी काहीही देणार नाही. यासीर उस्मान यांनी रेखावर जे पुस्तक लिहिलं आहे, त्यामध्ये या आत्महत्या पत्राचा उल्लेख आहे. त्यानुसार माझ्या संपत्तीमधून रेखाला काहीही देण्यात येऊ नये, असे लिहिले आहे. ती स्वतः कमावण्याबाबत सक्षम आहे, म्हणून मी तिच्यासाठी काहीही ठेवत नाही, असे त्यांनी लिहून ठेवले. आपली मैत्रिण आकाश बजाज जी त्यांची मनोचिकित्सक होती – तिची व तिच्या दोन मुलांची देखभाल आपल्या भावाने करावी, अशी इच्छा पण त्यांनी या पत्रात व्यक्त केली होती.

आधी घटस्फोट व नंतर मुकेश अग्रवाल यांची आत्महत्या यांच्या कचाट्यात सापडलेल्या रेखावर पुढे असेही आरोप करण्यात आले की, रेखाने फक्त पैशांसाठी मुकेश अग्रवालशी लग्न केले होते. पण मुकेशच्या भावाने पुढे लोकांसमोर सत्य मांडले. रेखाबद्दल जे काही बोललं जात आहे, ते साफ खोटं आहे, असं त्यानं सांगितलं. एवढंच नव्हे तर मुकेशचे घनिष्ट मित्र आणि दिल्लीचे माजी कमिशनर नीरज कुमार यांनीही ग्वाही दिली होती की, मुकेश अग्रवालच्या मृत्यूनंतर रेखाने त्याच्या कुटुंबियांकडून काहीच मागितले नाही.

तरीपण मुकेशच्या आत्महत्येबाबत रेखालाच जबाबदार धरण्यात आलं होतं. पतीला गिळंकृत केलेली, कैदाशिण, नॅशनल व्हॅम्प… अशी कितीतरी दुषणे रेखाला दिली गेली. रेखाची लोकप्रियता आता संपुष्टात येईल, असंही बोललं गेलं. पण असं काहीच घडलं नाही. रेखाची ग्रेस कमी झाली नाही. तिच्या चाहत्यांचा ओघ कमी झाला नाही. ती एक आख्यायिका झाली व कायमच राहील.