रीना मधुकरचे भन्नाट अंडरवॉटर फोटो शूट (Reena Ma...

रीना मधुकरचे भन्नाट अंडरवॉटर फोटो शूट (Reena Madhukar’s Thrilling Under Water Photo Shoot)

कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss ॲक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने केली आहे. रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. रीनाच्या या फोटोशूटचे तिच्या चाहत्यांकडून तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांकडूनही विशेष कौतुक होतंय. रीनाच्या या वॉव फोटोशूटमुळे बऱ्याच जणांनी तिची ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ म्हणून प्रशंसा केली आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे, परंतु मराठीत अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी करणारी रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. पाण्याच्या खाली जाऊन फोटोसाठी पोज् देणे, चेहऱ्यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट केल्या आहेत. या प्रकारच्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप यालाही विशेष महत्त्व असते.

रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, पाण्यातही ग्लो दिसेल असा मेकअप आदी गोष्टींचा विचार करुन त्यांची कलाकारी दाखवली आहे. हे सर्वकाही जुळून आलं की खरी कसरत सुरु होते ती फोटोग्राफरची. कॅमेराचे सेट पाण्याखाली घेऊन जाणे, जसा हवा अगदी तसाच शॉट मिळवणे ही सगळी कला फोटोग्राफरची.

या कमाल फोटोशूटचा कम्माल अनुभव सांगताना रीना म्हणते, “पाण्याच्या खाली जाऊन एक्सप्रेशन देणं, डोळे उघडे ठेवून कॅमेरा फेस करणं हे खूप ट्रिकी होतं. मला आणि फोटोग्राफर सुमीत, आम्हा दोघांनाही अशा प्रकारच्या फोटोशूटचा अनुभव नसल्यामुळे कसं होईल, काय होईल याची भीती होती पण काही तरी ॲडव्हेंचर करतोय म्हणून उत्साह जास्त होता. मुळात, थंडी इतकी होती की काय सांगू. पण माझी टीम निकेता, निखिल, सुमीत, नवीन, दिपेश, हर्षल हे सर्वजण फार सपोर्टिंग होते, त्यांनी मला संपूर्ण फोटोशूटच्या दरम्यान चिअर अप केलं. हे फोटोशूट एक टीम वर्क होतं.”

फोटोग्राफर सुमीत गुरवने त्याचा अनुभव सांगताना म्हटले की, “हा खूप वेगळा आणि छान अनुभव होता. शूट जेवढं इंटरेस्टिंग होतं तितकंच ते चॅलेंजिंगही होतं. याआधी कधी असं अंडरवॉटर फोटोशूट मी केलं नव्हतं. त्यामुळे खरंतर हे शूट करताना आधी थोडं टेन्शन होतं तितकीच एक्साईटमेंट देखील होती. शूट करताना पाण्याखाली जाऊन परफेक्ट टाईम वर क्लिक करणं तेवढा वेळ बॉडी पाण्याखाली स्टेबल ठेवणं हे खूप कठीण आहे. पण आम्ही ते उत्साहाने, आनंदाने आणि समाधानाने पूर्ण केलं.”

रीनाचं अंडरवॉटर फॅशन फोटोशूट हे ‘Team Work Makes Dream Work’ चं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. रीना मधुकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे. यात ती नायिका हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे. रीनाची ही पहिलीच मालिका आहे.