महोत्सवात ३ चित्रपटांचा विक्रम करणारी मराठी अभि...

महोत्सवात ३ चित्रपटांचा विक्रम करणारी मराठी अभिनेत्री (Record Breaking Performance Of Marathi Actress : 3 Films Screened In The Festival)

पणजी येथे सुरू असलेल्या इफ्फी अर्थात्‌ भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रावी किशोर या मराठी अभिनेत्रीने विक्रम केला आहे. तिचे ३ चित्रपट या महोत्सवात दाखविले जात आहेत.

‘वाट’(मराठी), ‘पीकाबू’ (हिंदी) आणि ‘कुपांचो दर्यो’ (कोंकणी) असे हे चित्रपट आहेत. त्यामध्ये रावी किशोरने प्रमुख भूमिका केल्या आहेत. तीन वेगवेगळ्या भाषेतील, एकाच अभिनेत्रीचे ३ चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रदर्शित होणे हा दुर्मिळ योग आहे.

‘वाट’ हा मराठी चित्रपट अंधश्रद्धा विरोधी कथेचा आहे. तर ‘पीकाबू’ हा थरारपट आहे. अन्‌ ‘कुपांचो दर्यो’ हा कोंकणी चित्रपट मनोहर पर्रीकर यांच्या कथेवर आधारित आहे. ती एक प्रेमकथा आहे.

रावी किशोर ही अभिनेत्री मूळ मुंबईची आहे. तिने गेल्या २ वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कारकीर्द गाजवली आहे. ३ मल्याळम्‌ आणि १ तेलुगु वेब सिरीज्‌मध्ये तिच्या भूमिका गाजल्या आहेत. या गुणी अभिनेत्रीस २०१९ च्या इफ्फी महोत्सवात ‘घरटं’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा सन्मान मिळाला आहे.

आपल्या वाटचालीबाबत रावीने ‘माझी सहेली’साठी खास मुलाखत देताना सांगितलं की, “कॉलेजात असल्यापासून मी नाटकात कामे केली. मी एम. ए. करत होते, तेव्हापासून अभिनय करते आहे. नंतर संधी मिळत गेल्या व मी चित्रसृष्टीत आले. ‘वाट’ या मराठी चित्रपटामध्ये माझी चरित्र अभिनेत्री म्हणून निवड झाली होती. पण नंतर मला नायिकेची भूमिका देण्यात आली. एका रात्रीत मी या भूमिकेची तयारी केली. दक्षिणेकडील चित्रसृष्टीत मी तेलुगु चित्रपटामधून आले. अन्‌ मल्याळम्‌मध्ये स्थिरावले. आपला अभिनय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा ही माझी आकांक्षा आहे.”

  • नंदकिशोर धुरंधर