झाफरानी चिकन बिर्याणी (Zaff...

झाफरानी चिकन बिर्याणी (Zaffrani Chicken Biryani)

झाफरानी चिकन बिर्याणी

साहित्य : 2 कप बासमती तांदूळ, अर्धा किलो चिकन, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 4 लवंगा, 1 दालचिनी काडी, 1 चक्रफूल, 2 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा कप दही, 1 कप पुदिन्याची पानं, 3 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून बटर, 10-12 केशर काड्या, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : 6 कप पाणी उकळत ठेवा. त्यात तांदूळ शिजत ठेवा. तांदूळ अर्धवट शिजत आले की, त्यात लिंबाचा रस, केशर आणि मीठ घाला. एक उकळी आली की, आच बंद करून भात गाळून घ्या. मोठ्या परातीत मोकळा करून बाजूला ठेवा. पातेल्यामध्ये तेल आणि बटर गरम करून, त्यात लवंग, दालचिनी, चक्रफूल, वेलची आणि तमालपत्र घालून थोडं परतून घ्या. मग त्यात चिरलेला कांदा घाला. सोनेरी रंग आला की, त्यात पुदिन्याची पानं आणि आलं-लसूण पेस्ट घालून थोडा वेळ परता. आता त्यात हळद, लाल मिरची पूड, धणे पूड आणि दही एकत्र करा. त्यात चिकन घाला. थोडं मीठ आणि पाणी घालून झाकण लावा आणि मंद आचेवर 10-15 मिनिटं शिजत ठेवा.
आता जाड बुडाच्या पातेल्यात तळाला भाताचा थर लावा. त्यावर चिकनची ग्रेव्ही पसरवा. त्यावर पुन्हा भाताचा-चिकनचा थर असे दोन-तीन थर लावा. पातेलं व्यवस्थित बंद करा. आचेवर तवा गरम करून, त्यावर हे पातेलं 15-20 मिनिटं ठेवा. त्यानंतर 15 मिनिटांनी पातेलं उघडा. कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम झाफरानी चिकन बिर्याणी रायत्यासोबत सर्व्ह करा.