भाज्यांची बर्फी (You Can Make Burfi From Vegeta...

भाज्यांची बर्फी (You Can Make Burfi From Vegetables)

गाजराची बर्फी

साहित्य: 8-10 केशरी गाजर, 1 वाटी खवा दीड वाटी साखर, अर्धी वाटी दूध, 2 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: गाजर सोलून घ्यावीत. मिक्सर मध्ये बारीक वाटावीत. एका पॅनमध्ये तूप तापवावे. त्यावर गाजर प्युरी परतावी. हलकीशी परतल्यावर त्यात साखर घालावी. खवा व दूध घालून मिश्रण एकजीव परतावे. बर्फीच मिश्रण दाट झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. डिशला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापावी. थंड झाल्यावर बर्फीच्या वडया कापून घ्याव्यात.

 

बटाटा बर्फी

साहित्य: 5 बटाटे, 1 वाटी खवा अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क, 1 वाटी साखर, 2 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा वेलची- जायफळ पूड.
कृती: बटाटे सोलून घ्यावेत. जाडसर किसावेत. एका पॅनमध्ये तूप तापवावे. त्यावर बटाट्याचा कीस सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावा. यातच खवा घालावा व तोही एकजीव परतावा. मिश्रणाचा रंग बदलल्यावर त्यात साखर घालावी. कंडेन्स्ड मिल्क घालून सर्व मिश्रण एकजीव करावे. मंद आंचेवर आळेपर्यंत सातत्याने परतावे. खाली उतरवून वेलची पूड घालावी. ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडी पाडावी.

 

नारळ बर्फी

साहित्य: 2 वाटया ओले खोबरे, 2 वाटया साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी खवा, 2 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: ओले खोबरे, साखर एकत्र कालवून घ्या. एका पँनमध्ये तुपावर खवा परतावा. त्यावर साखर-नारळ मिश्रण घाला. मंद आंचेवर परता. वरून वेलची पूड व मिल्क पावडर खमंग व दाटसर परतवून घ्या. खाली उतरवा. ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडी पाडावी.

 

दुधी बर्फी

साहित्य: 5 मोठया वाटया ताजा किसलेला दुधी, 2 वाटया मिल्क पावडर, 1 वाटी साखर, अर्धी वाटी सुका मेवा, 4 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: दुधी सोलून किसून घ्या. त्याचं पाणी तसंच ठेवा. त्यात हाताने मिल्क पावडर घाला व एकजीव कालवा. एका पॅनमध्ये तूप तापवा. त्यावर साखर हलकीशी परता. वरून तयार मिश्रण ओता. मंद आंचेवर मिश्रण सातत्याने परता. मिश्रण आळल्यावर त्यात सुका मेवा आणि वेलची पूड घाला. बर्फीचं मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवा. ट्रेला तुपाचा हात लावून त्यावर बर्फी थापा. वडया पडून सर्व्ह करा.

 

मिंट बर्फी

साहित्य: 2 वाटया ताजी पुदिन्याची पाने, 2 वाटया खवा, दीड वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, थोडंसं तूप.
कृती: पुदिना ताजाच घ्यावा. स्वच्छ धुवावा. बारीक चिरावा. एका पॅनमध्ये तूप तापवावे. त्यावर खवा परतावा. वरून दूध व साखर घालावी. हलकेसे परतल्यावर मिश्रण पातळ असतानाच त्यात पुदिन्याची पाने घालावीत. मिल्क पावडर, वेलची पूड घालून मिश्रण मंद आंचेवर दाट होईपर्यंत परतावे व शेवटी खाली उतरवावे. ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वाडी पाडावी.

 

भोपळा बर्फी

साहित्य: 2 वाटया केशरी भोपळ्याचा किस, 1 वाटी दूध, अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क, पाव वाटी पातळ चिरलेले काजू, 1 वाटी साखर, 5 चमचे लोणी.
कृती: एका पॅनमध्ये लोणी तापवा. त्यावर भोपळ्याचा कीस परता  वरून दूध व साखर एकत्रित घाला. मंद आंचेवर मिश्रण आळेपर्यंत ठेवा. मिश्रण दाट  झाल्यावर त्यात काजूचे काप व कंडेन्स्ड मिल्क घाला. घट्ट होईपर्यंत परता. नंतर खाली उतरवा. थंड झाल्यावर ट्रेला तुपाचा हात लावून बर्फी थापून घ्या. वडया पडून सर्व्ह करा.