चिकूची बर्फी , शेव बर्फी (T...

चिकूची बर्फी , शेव बर्फी (Two Burfis Of Different Flavour)

चिकूची बर्फी

साहित्य : 10-12 मध्यम आकाराचे पिकलेले चिकू, पाव वाटी साखर, 1 वाटी दूध पावडर, 4 चमचे मनुका, 4 चमचे काजू, 1 चमचा वेलची पूड, 4 चमचे तूप, अर्धा लीटर दूध.
कृती : चिकू धुऊन साल काढून, त्यातील बिया काढून टाका. चिकूचा गर चाळणीने गाळून घ्या. सर्वप्रथम दुधात, साखर आणि दूध पावडर घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. नंतर ते आचेवर ठेवून उकळवा. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट झालं की, त्यात चिकूचा गर घालून पुन्हा शिजवा. मिश्रणाचा गोळा घट्ट झाल्यावर त्यात सुका मेवा आणि वेलची पावडर एकजीव करा. नंतर हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटात पसरवून त्याच्या वड्या पाडा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.

शेव बर्फी

साहित्य : 1 वाटी खवा, 1 वाटी मीठ नसलेली शेव, 1 वाटी पिठीसाखर, सजावटीसाठी थोडे बदाम-पिस्त्याचे काप, 2-4 थेंब गुलाबाचं इसेन्स.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये खवा चांगला भाजून घ्या. खवा आचेवरून उतरवून त्यात पिठीसाखर आणि गुलाबाचं इसेन्स मिसळा. नंतर त्यात शेव घालून चांगलं एकजीव मिश्रण तयार करा. थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घाला आणि सारखं करून घ्या. त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पसरवा. मिश्रण साधारण थंड झालं की, त्यावर हवा असल्यास चांदीचा वर्ख लावून, वड्या पाडा.

– विष्णू मनोहर