तिरंगी रेसिपी (Tricolor Recipes On Republic Day)

तिरंगी रेसिपी (Tricolor Recipes On Republic Day)

आपल्या पेहरावाप्रमाणेच आपल्या तिरंग्याची झलक जर आपल्या आहारातही दाखवता आली तर देशभक्तीचा रंगही अजून तेजाळेल नाही का? तेव्हा प्रजासत्ताक दिनी काही सोप्या, सकस आणि चटकदार तिरंगी रेसिपीज तुम्ही नक्कीच आजमावा.

तिरंगी सँडविच
साहित्यः 4 ब्रेड स्लाइसेस, 2 चीज स्लाइसेस, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 टेबलस्पून मेयोनीज आणि हिरवी चटणी
कृतीः टोमॅटो सॉस आणि मेयोनीज एकत्र करून बाजूला ठेवा. ब्रेडच्या एका स्लाइसवर टोमॅटो सॉस आणि मेयोनीजचं मिश्रण लावा. त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर चीज स्लाइस ठेवा. मग तिसरी ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर हिरवी चटणी लावा आणि शेवटची ब्रेड स्लाइस ठेवा. त्रिकोणी आकारात कापून तिरंगी सँडविच सर्व्ह करा.

तिरंगी पास्ता
साहित्यः 3 कप पास्ता (उकळवून घेतलेला), पाव कप ब्लॅक ऑलिव्ह्स, पाव कप लाल आणि हिरवी सिमला मिरची (चिरून घेतलेली), 1 कप ब्रोकोली, 1 कप टोमॅटो, 1 कप मोजोरेला चीज (किसलेले) इटालियन ड्रेसिंगसाठीः 3 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, 2 टेबलस्पून पार्सलेची पानं, 2 टेबलस्पून व्हिनेगर, अर्धा टेबलस्पून लसणाच्या पाकळया, पाव टेबलस्पून ऑरिगॅनो आणि पाव टेबलस्पून चिली फ्लेक्स, 1 टेबलस्पून डाइड बेसिल आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस.
कृतीः ब्रोकोली नरम होईपर्यंत उकळवा. नंतर एका बाऊलमध्ये ब्रोकोली, उकळवलेला पास्ता, दोन्ही सिमला मिरची, टोमॅटो आणि ऑलिव्ह्स एकत्र करा. नंतर सर्व इटालियन साहित्य मिसळून चांगलं मिक्स करा. 30 मिनिटं फ्रिजमध्ये थंड होण्याकरिता ठेवा. मोजेरोला चीजने गार्निश करून सर्व्ह करा.

तिरंगी पुलाव
साहित्यः 1 कप शिजवलेला भात (भाताचे तीन समान भाग करून घ्या). ऑरेंज भाताकरिताः पाव कप टोमॅटो प्यूरी, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून तूप. ग्रीन भाताकरिताः अर्धा कप पालक प्युरी, 1 टीस्पून आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून जिरं. व्हाइट भाताकरिताः पाव टीस्पून जिरं, 2 टेबलस्पून घी, चवीनुसार मीठ.
कृतीः ऑरेंज भात बनवताना, ग्रीन भात बनवताना, एका पॅनमध्ये तूप गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. नंतर त्यात आलं-हिरवी मिरचीची पेस्ट घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. शिजवलेला भात आणि उरलेले साहित्य एकत्र करून परतून घ्या. 5 मिनिटानंतर आचेवरून उतरवून ठेवा. व्हाइट भात बनवण्याकरिताः पॅनमध्ये तूप गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. नंतर त्यात शिजवलेला भात घालून 5 मिनिटं परतवा. सर्व्हिंग करताना डिशमध्ये आधी हिरवा भात, त्यावर सफेद आणि वर ऑरेंज भात असा थर लावा. वरून कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.

तिरंगी रवा ढोकळा
साहित्यः 3 कप सुजी, 3 कप दही, 1 टेबलस्पून हिरवी चटणी, अर्धा टेबलस्पून आलं- हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 टेबलस्पून गाजरची प्युरी, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून फ्रुट सॉल्ट, 2 लिंबाचा रस.
फोडणीसाठीः 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई, थोडेसे कढिपत्ते, 2-3 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
कृतीः एका भांड्यामध्ये सुजी आणि दही एकत्र करून 30 मिनिटं झाकून ठेवा. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घालून चांगलं फेटून घ्या. तयार मिश्रणाचे तीन सारखे भाग करा. ग्रीन ढोकळ्यासाठी एका भागामध्ये हिरवी चटणी मिसळून फेटा. ऑरेंज ढोकळ्यासाठी मिश्रणाच्या दुसर्‍या भागात गाजर प्युरी, लाल मिरची पावडर आणि ऑरेंज कलर मिसळून फेटा. तिसरा भाग तसाच ठेवा. नंतर तिन्ही रंगाचे मिश्रण वेगवेगळ्या ताटामध्ये ओतून 10 ते 12 मिनिटं वाफेवर शिजू द्या. अशाच प्रकारे तिन्ही रंगांचा ढोकळा बनवून घ्या.
सजावट करतानाः सुरुवातीला ताटात हिरव्या रंगाचा ढोकळा ठेवा. त्यावर फोडणी, लिंबाचा रस, मीठ, लाल मिरची पावडर घाला. नंतर सफेद आणि शेवटी ऑरेंज कलरचा ढोकळा ठेवून त्यावर फोडणी, लिंबाचा रस, मीठ, लाल मिरची पावडर घाला. कोथिंबीर घालून सजवा.

तिरंगी इडली
साहित्यः 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून पालक किंवा हिरव्या मटारची प्युरी, 2 टेबलस्पून गाजराची प्यूरी, चिमुटभर ऑरेंज फूड कलर, थोडेसे तेल.
कृतीः पालक प्युरी बनवण्याकरिता – पालक धुऊन घ्या. पॅनमध्ये अर्धा कप पाणी घेऊन त्यात पालकाची पानं ठेवून 3-4 मिनिटं त्याला वाफवून घ्या. थंड करून मिक्सरमधून वाटून घ्या.
गाजराची प्युरी – 3 ते 4 गाजरांचे छोटे छोटे तुकडे करून ते वाफवून घ्या. थंड करून मिक्सरमधून ते वाटून घ्या.
इडली बनविण्याकरीता – तांदूळ आणि उडदाची डाळ धुऊन वाटून घ्या. मीठ घालून 8-10 तास झाकून ठेवा. तयार मिश्रण तीन भागात वाटून घ्या. हिरवी इडली बनविण्याकरिता एक भाग मिश्रणामध्ये पालक प्युरी घालून फेटून घ्या. तपकिरी रंग बनवण्याकरिता दुसर्‍या भागामध्ये गाजर प्युरी आणि ऑरेंज कलर घालून मिश्रण फेटून घ्या. तिसरा भाग तसाच राहू द्या. इडली पात्रास तेल लावून तिन्ही मिश्रण टाकून 10-12 मिनिटं शिजू द्या. तिरंगी इडली खोबर्‍याची चटणी आणि सांबार सोबत खा.