होळी निमित्त रुचकर पदार्थ (Tasty Snacks Of Fest...

होळी निमित्त रुचकर पदार्थ (Tasty Snacks Of Festival)

गाजर का हलवा
साहित्य : अर्धा किलो कोवळी गाजर, 2 वाटी साखर, 1 वाटी खवा, अर्धा वाटी दूध पावडर, अर्धा वाटी तूप, पाव वाटी बारीक चिरलेला सुकामेवा.
कृती : गाजर स्वच्छ धुऊन तासून घ्या. नंतर किसून घ्या. जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून, त्यावर सुकामेवा आणि खवा परतवून घ्या. त्यात गाजराचा कीस घालून, मिश्रणाचा रंग बदलेपर्यंत परतवा. नंतर त्यात साखर आणि दूध पावडर घाला. मिश्रण व्यवस्थित आटेपर्यंत परतवत राहा. गाजर व्यवस्थित शिजले की, आच बंद करा. गाजराचा हलवा साधारण थंड करून गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.

बुंदी खीर
साहित्य : 1 कप गोड बुंदी, अर्धा लीटर दूध, 2 टेबलस्पून काजू-बदाम पूड, 1 टेबलस्पून वेलची पूड, 3 टेबलस्पून दुधाची पूड, 4 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क.
कृती : सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करत ठेवा. मंद आचेवर दूध आटून अर्ध होईपर्यंत उकळवा. आता त्यात 1 टेबलस्पून सुकामेव्याची पूड, दुधाची पूड आणि कंडेन्स्ड मिल्क घालून 3 मिनिटं उकळवा. मिश्रण सतत ढवळत राहा. नंतर त्यात वेलची पूड घालून ढवळा. बुंदीमध्ये उर्वरित सुकामेव्याची पूड घालून, त्यात बुंदी व्यवस्थित घोळवून घ्या. ही बुंदी दुधाच्या मिश्रणात घालून एक उकळी काढा आणि आच बंद करा. बुंदीची खीर गरमागरम किंवा थंड करून गारेगार सर्व्ह करा.
टीप :
*    बुंदी सुकामेव्याच्या पुडीमध्ये घोळूनच दुधाच्या मिश्रणात सोडा, अन्यथा बुंदीचा गोळा होण्याची शक्यता असते.
*    उर्वरित बुंदीच्या लाडूपासूनही ही खीर बनवता येईल.

गव्हाच्या लाह्यांचा चिवडा
साहित्य : 150 ग्रॅम गव्हाच्या लाह्या, 2 टेबलस्पून शेंगदाणे, चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ, 3 टेबलस्पून तेल, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून काजू, अर्धा टीस्पून हिंग, 20-25 कढीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून डाळे, 1 टीस्पून गरम मसाला, चिमूटभर साखर, अर्धा टेबलस्पून बडीशेप पूड, अर्धा टेबलस्पून सुंठ पूड, अर्धा टीस्पून आमचूर पूड.
कृती : कढईत गव्हाच्या लाह्या पाच-दहा मिनिटं कोरड्या भाजून घ्या. त्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत तेल गरम करून त्यात हिंग, हळद, लाल मिरची पूड, शेंगदाणे, डाळे आणि काजू घालून परतवा. साधारण पाच-सात मिनिटांत ते कुरकुरीत होतील. नंतर त्यात कढीपत्ता घालून परतवा. कढीपत्ता कुरकुरीत झाला की, त्यात गव्हाच्या लाह्या घाला आणि मिश्रण चांगलं एकजीव करा. त्यात गरम मसाला, साखर, बडीशेप पूड, आलं पूड आणि आमचूर पूड मिसळा. हे मिश्रण मध्यम आचेवर पाच-सहा मिनिटं परतवा. गव्हाच्या लाह्यांचा हा चिवडा गरमागरमही स्वादिष्ट लागतो. अन्यथा थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास 20-22 दिवस उत्तम टिकतो.

मटर दही गुजिया
साहित्य : 1 कप उडीद डाळ, 1 कप मटार क्रश केलेले, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून बारीक किसलेलं आलं, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून बदामाचा जाडसर चुरा, तळण्यासाठी तेल.
दह्यासाठी : 1 कप ताजं दही, 1 टेबलस्पून चिंचेची चटणी, 1 टेबलस्पून हिरवी चटणी, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून जिरे पूड, 1 टेबलस्पून गरम मसाला, आवश्यकतेनुसार पाणी, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून आमचूर पूड.
कृती : उडीद डाळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजत ठेवा. नंतर निथळूून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. हे मिश्रण तासाभरासाठी बाजूला झाकून ठेवा. तासाभरानंतर मटार जाडसर वाटून उडीद डाळीच्या मिश्रणात मिसळा. त्यात मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घालून मिश्रण चांगलं फेसून घ्या. पाण्यात थोडं मीठ आणि 2 टीस्पून गरम मसाला मिसळून ते बाजूला ठेवून द्या. कढईत तेल गरम करत ठेवा. आता वडे थापतो त्याप्रमाणे केळ्याच्या पानावर किंवा दुधाच्या पिशवीवर उडीद डाळ-मटारचं मिश्रण गोलाकार थापा. त्याच्या मध्यभागी आलं, मिरची, बदाम आणि कोथिंबीर ठेवा. त्यावर थोडं मीठ भुरभुरा. पान किंवा दुधाची पिशवी दुमडून करंजी दुमडा. ही करंजी अलगद उचलून हळूच गरम तेलात सोडा. मंद आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्या. करंजी तळून तयार झाल्यावर लगेच गरम मसाला मिसळलेल्या पाण्यात सोडा. पाच मिनिटांकरिता करंजी पाण्यातच राहू द्या. त्यानंतर पाण्यातून काढून, हळुवार दाबून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या. अशा प्रकारे सर्व करंज्या तळून, पाण्यातून काढून एका ताटात ठेवा. दह्यामध्ये थोडं मीठ घालून चांगलं फेटा. सर्व्हिंग डिशमध्ये सर्वप्रथम करंज्या ठेवून, त्यावर दही घाला. त्यावर चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालून, वरून आमचूर पूड, गरम मसाला, चाट मसाला, जिरे पूड, धणे पूड, लाल मिरची पूड भुरभुरा. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

 

अंगुरी भाजी
साहित्य : 1 कप द्राक्षं, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, 10-15 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून सांबर मसाला, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : द्राक्षं स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. नंतर प्रत्येक द्राक्षाचे दोन भाग करून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा-लसूण घालून 5 मिनिटं परतवा. नंतर त्यात गरम मसाला, लाल मिरची पूड, सांबार मसाला आणि कोथिंबीर घालून चांगलं परतवून घ्या. आता त्यात द्राक्षं घालून परतवा. शेवटी मीठ आणि आवश्यकता असल्यास थोडं पाणी मिसळून एक उकळी काढा. उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित परतवून त्यावर कोथिंबीर घाला आणि गरमागरम अंगुरी भाजी पोळीसोबत सर्व्ह करा.
टीप : द्राक्षं थोडी गोड, थोडी आंबट असतात, त्यामुळे चवीचा समतोल राखण्यास सांबार मसाला उपयुक्त ठरतो.

अ‍ॅपल पकोडा
साहित्य : 1 कप बेसन, अर्धा कप बारीक रवा, स्वादानुसार मीठ, 1 कप तेल, 3-4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 4-5 हिरव्या मिरच्यांची बारीक पेस्ट, 1 टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, 2 सफरचंद सालासकट बारीक चिरलेले, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून आमचूर, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, रवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. भज्याप्रमाणे एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. नंतर त्यात लसूण, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल मिरची पूड, लिंबाचा रस, आमचूर पूड, कोथिंबीर आणि सफरचंदाचे तुकडे एकत्र करा. त्यात स्वादानुसार मीठ मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण मुरण्यासाठी 5 मिनिटं बाजूला ठेवून द्या. नंतर त्यात 2 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. गरम तेलात मंद आचेवर या मिश्रणाचे लहान-लहान पकोडे तळून घ्या. गरमागरम कुरकुरीत अ‍ॅपल पकोडा दह्यासोबत सर्व्ह करा.

मसाला ताक
साहित्य : 1 किलो दही, 4-5 हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, 2 टीस्पून जिरं, 1 टीस्पून काळं मीठ.
कृती : मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि मीठ एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. दह्यात पाणी घालून, ते घुसळा. त्यात हा वाटलेला मसाला घालून पुन्हा चांगलं घुसळा आणि थंडगार मसाला ताक सर्व्ह करा.

होळीसाठी गोडधोड पदार्थ (Special Sweets For Holi)