कैरीच्या चविष्ठ चटण्या (Tasty Raw Mango Chutney)

कैरीच्या चविष्ठ चटण्या (Tasty Raw Mango Chutney)

कैरीची चटपटीत चटणी


साहित्य : पाऊण कप कैरीच्या बारीक फोडी, 2 टेबलस्पून तीळ, अर्धा टेबलस्पून कलौंजी (कांद्याचं बी), दीड टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून काळं मीठ, 1 टेबलस्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर, मीठ, पाणी, 1 टेबलस्पून गोडं तेल.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून परतून घ्या. त्यात तीळ, कलौंजी, साखर, काळे मीठ (चवीनुसार), जिरे पावडर घाला. थोडं हलवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कैरीच्या फोडी मऊ होईपर्यंत शिजू द्या. ही चटपटीत कैरीची चटणी कचोरीसोबत सर्व्ह करा.

कांदा-कैरी चटणी


साहित्य : 2 कैर्‍या, 1 कांदा, 1 कप चिरलेली कोथिंबीर, 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून साखर, अर्धा कप किसलेलं खोबरं, चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी साहित्य : 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हिंग पावडर, 4 सुक्या लाल मिरच्या.
कृती : कैर्‍यांची सालं काढून फोडी करा. कांदा चिरून घ्या. आता मिक्सरमध्ये कैरीच्या फोडी, कांद्याच्या फोडी, कोथिंबीर, किसलेलं खोबरं, लाल मिरची पावडर, मीठ व साखर एकत्र करून जाडसर वाटून घ्या. चटणी तयार आहे. आता फोडणीसाठी दिलेलं साहित्य वापरून खमंग फोडणी करा. तयार चटणी बाऊलमध्ये काढून त्यावर ही खमंग फोडणी वरून घाला नि खायला द्या.