चटकदार आंबट-गोड लोणची (Tasty Pickle Recipe)

चटकदार आंबट-गोड लोणची (Tasty Pickle Recipe)

रोजचं साधं जेवण असो वा पंचपक्वान्नांनी भरलेली थाळी… पानाची डावी बाजू चटकदार लोणच्याशिवाय सजतच नाही. त्यातही लोणचं म्हणजे कैरी, हे समीकरण इतकं पक्कं झालं आहे की, त्यात लिंबाचीही वर्णी कधीतरीच लागते. मात्र कैरी-लिंबा शिवायही अनेक भाज्या-फळांपासून लोणचं तयार करता येतं आणि तेही तितकंच चटकदार लागतं.

कोबीचं लोणचं

साहित्य ः 1 किलो कोबी, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी, 3 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून कलौंजी, 1 टीस्पून बडीशेप, स्वादानुसार मीठ.
कृती ः बडीशेप जाडसर वाटून घ्या. कोबी स्वच्छ धुऊन कोरडा करा आणि बारीक चिरून घ्या. मीठ आणि सर्व मसाले एकत्र करा. एका पॅनमध्ये तेल कोमट गरम करून, ते मसाल्याच्या मिश्रणामध्ये एकत्र करा. त्यात कोबी घालून एकजीव करा. हे मिश्रण दहा मिनिटं झाकून ठेवा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं चार-पाच दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.

फ्लॉवर-ब्रोकोलीचं लोणचं


साहित्य ः 1 किलो फ्लॉवर, अर्धा किलो ब्रोकोली, 250 ग्रॅम पिवळी मोहरी, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून गरम मसाला पूड, 2 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून हिंग, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती ः फ्लॉवर आणि ब्रोकोली स्वच्छ करून धुऊन, त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. हे तुकडे दोन मिनिटं पाण्यात उकळवा. नंतर आचेवरून उतरवून पाणी निथळून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग आणि जिर्‍याची फोडणी द्या आणि कढई आचेवरून खाली उतरवा. नंतर त्यात फ्लॉवर-ब्रोकोली, मीठ आणि उर्वरित सर्व मसाले घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. हे लोणचं साधारण आठवडाभर चांगलं मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.