अंड्याच्या स्वादिष्ट रेसिपीज (Tasty egg recipes)

अंड्याच्या स्वादिष्ट रेसिपीज (Tasty egg recipes)

1 एग चीझ बॉल्स

साहित्य : 2 अंडी (उकडून चिरलेली), 1 कप दूध, 2 टेबलस्पून मैदा, 1 कप ब्रेडचा चुरा, थोडं किसलेलं चीझ, 1 टीस्पून मोहरी, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, थोडा ब्रेडचा चुरा वरून लावण्यासाठी, तळण्यासाठी तेल.

कृती : दूध आणि मैदा एकत्र करून फेटा. आचेवर ठेवून सतत ढवळत उकळी काढा. नंतर थंड करून त्यात चीझ, ब्रेडचा चुरा, मोहरी, मीठ, काळी मिरी पूड आणि अंड्याचे तुकडे घालून एकजीव करा. या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल्स बनवा. हे एग बॉल्स ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवून गरम तेलातून क्रिस्पी तळून घ्या.

2 एग अँड कॅबेज समोसा

साहित्य : 2 अंडी (कडक उकडून चिरलेली), 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्या, 2 कप कोबी चिरलेली, अर्धा टीस्पून गरम मसाला,

4 चपात्या, 1 टेबलस्पून कणकेच्या पिठाची पेस्ट, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार चाट मसाला, स्वादानुसार मीठ.

कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. नंतर त्यात कोबी, गरम मसाला पूड आणि मीठ घालून झाकण लावून शिजवा. उकडलेली अंडी आणि चाट मसाला घालून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर चपातीचे दोन भाग करून, त्याचे कोन तयार करा. आता त्या कोनमध्ये अंड आणि कोबीचं मिश्रण घालून कोन पिठाच्या पेस्टने चिकटवून बंद करा. अशाच प्रकारे इतरही समोसे करून घ्या. गरम तेलात समोसे खमंग तळून घ्या.

 

3 एग पुलाव

साहित्य : 4 अंडी कडक उकडलेली, 1 कप बासमती तांदूळ भिजवलेले, 4 टेबलस्पून तेल, 1 तुकडा दालचिनी, 1 तमालपत्र, 3 वेलच्या, 3 लवंगा, 1 कांदा बारीक चिरलेेला, 4 लसूण पाकळ्या किसलेल्या, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा कप कोथिंबीर, 2 टोमॅटो चकत्या केलेले, 2 कप पाणी, स्वादानुसार मीठ.

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, वेलची, लवंगा आणि तमालपत्र परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि किसलेला लसूण घालून सोनेरी रंगावर परतून घ्या. उकडलेल्या अंड्यांना काट्याने टोचे करून त्यात हळद आणि लाल मिरची पावडर घालून चार ते पाच मिनिटं परतून घ्या. आता भिजवलेले तांदूळ, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्या. कोथिंबीर आणि टोमॅटोचे स्लाइस घालून झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा.

 

4 एग ड्रॉप सूप

साहित्य : 3 अंडी, 4 कप चिकन स्टॉक, अर्धा टीस्पून किसलेलं आलं, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 3 पातीचे कांदे चिरलेले, 1 कप मशरूम पातळ चकत्या केलेले, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, थोडा पातीचा कांदा सजावटीसाठी.

कृती : एका पॅनमध्ये चिकन स्टॉक, आलं, सोया सॉस, पातीचा कांदा, मशरूम, मीठ आणि काळी मिरी पूड एकत्र करून उकळी येऊ द्या. पाव कप पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर एकजीव करून, ते उकळणार्‍या सूपमध्ये घाला. हळूहळू ढवळत त्यात फेटलेलं अंडं मिसळा. अंडं शिजलं की, पातीच्या कांद्याने सजवून गरम सूप सर्व्ह करा.