तंदूरी चिकन (Tandoori Chicken)

तंदूरी चिकन (Tandoori Chicken)

तंदूरी चिकन

साहित्य : अर्धा किलो चिकनचे मोठ्या आकाराचे तुकडे.
मॅरिनेट 1 : 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून तेल, 1 टीस्पून मीठ.
मॅरिनेट 2 : 2 कप दही, 2 टेबलस्पून लाल मिरी पूड, 2 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 3-4 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून तंदूरी मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिरं पूड, 1 टीस्पून धणे पूड, 1 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप बारीक चिरलेली पुदिन्याची पानं.
कृती : चिकन स्वच्छ करून धुऊन निथळून घ्या. धारदार सुरीने चिकनच्या तुकड्यांवर तिरप्या खोलवर चिरा द्या. आता एका वाडग्यात पहिल्या मॅरिनेटचं सर्व साहित्य एकजीव करा. हे मिश्रण चिकनच्या तुकड्यांवर आणि चिरांमध्येही चोळून लावा. हे चिकन एका वाडग्यात ठेवून, ते प्लॅस्टिक रॅपने बंद करा आणि तीस मिनिटांकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता अन्य वाडग्यात सर्वप्रथम दुसर्‍या मॅरिनेटमधील दही चांंगले फेटून घ्या. त्यात सर्व सुके मसाले घालून पुन्हा फेटा. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. शेवटी कोथिंबीर आणि पुदिना घालून एकजीव मिश्रण तयार करा. 30 मिनिटांनंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं चिकन बाहेर काढा. चिकनचे तुकडे एक-एक करून दह्याच्या मिश्रणात घाला. सर्व तुकड्यांना दह्याचं मिश्रण व्यवस्थित लागेल, याची काळजी घ्या. आता हे भांडंही प्लॅस्टिक रॅपने बंद करून किमान तीन-चार तासांसाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. चिकन रात्रभर मॅरिनेट होण्यासाठी ठेवल्यास उत्तम.
आता 200 डिग्रीवर प्रीहिट केलेल्या ओव्हनमध्ये चिकनचे तुकडे ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. शेवटी चिकनच्या तुकड्यांवर थोडं बटर पसरवून, ओव्हनचं तापमान थोडं वाढवा आणि चिकन पुन्हा ओव्हनमध्ये ठेवा, म्हणजे ते क्रिस्पी होईल. गरमागरम तंदूरी चिकन सॅलेड व हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.