उत्तरेकडील गोड पदार्थ (Swee...

उत्तरेकडील गोड पदार्थ (Sweet Varities From Nothern India)

तिल की चिक्की

साहित्य : 1 वाटी हातसडीचे तीळ, 1 वाटी साखर, 3 टेबलस्पून तूप, 3 टीस्पून बारीक चिरलेला सुकामेवा, अर्धा टीस्पून जायफळ पूड, 2-3 लवंगा.
कृती : एका नॉनस्टिक पॅनमध्ये दीड टेबलस्पून तूप गरम करा. त्यावर तीळ हलका रंग बदलेपर्यंत परतवून घ्या. नंतर आचेवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. त्याच पॅनमध्ये पुन्हा दीड टेबलस्पून तूप गरम करून त्यावर साखर घाला. साखर विरघळल्यावर त्यात लवंगा आणि सुका मेवा घालून हलका गरम होऊ द्या. आता यात जायफळ पूड आणि तीळ घालून चांगले परतवा. एका मोठ्या थाळीत, पोळपाटावर किंवा ट्रेमध्ये तुपाचा हात लावून त्यावर हे चिक्कीचं मिश्रण ओता आणि लाटण्याने पातळ लाटा. मिश्रण साधारण थंड झालं की, वड्या पाडा. पूर्णतः थंड झाल्यावर सर्व्ह करा किंवा डब्यात भरून ठेवा.

 

गुलगुले

साहित्य : 2 वाटी गव्हाचं पीठ, दीड वाटी गूळ, 2 टीस्पून बडीशेप, 4 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : गव्हाचं पीठ आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या. गूळ किसून एका वाडग्यात ठेवा आणि त्यावर 1 वाटी उकळतं पाणी घाला. पाण्यात गूळ विरघळू द्या. गूळ पूर्णतः विरघळल्यावर, गव्हाच्या पिठावर ओता. त्यात बडीशेप घालून, मिश्रण चांगलं फेटा. मिश्रण जरा घट्ट असायला हवं. आता कढईत तूप गरम करून, त्यात डावाने या मिश्रणाचे लहान-लहान गुलगुले सोडा. गुलगुले गरम तुपात लालसर तळून घ्या. गरमागरम गुलगुले सायीच्या दह्यासोबत सर्व्ह करा.

 

शुफ्ता

साहित्य : पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू, पाव वाटी मनुका, पाव वाटी पिस्ता, पाव वाटी अक्रोड, पाव वाटी खजूर, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचे तुकडे, पाव वाटी पनीर, दीड वाटी साखर, अर्धा वाटी तूप, अर्धा टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून गुलाबाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून सुंठ पूड, अर्धा टीस्पून केशर पूड.
कृती : सुका मेवा जाडसर चिरून एकत्र करून ठेवा. सुकं खोबरं आणि पनीरचेही साधारण त्याच आकाराचे तुकडे करा. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून, त्यात पनीर आणि सुक्या खोबर्‍याचे तुकडे तळून बाजूला ठेवून द्या. उर्वरित तुपात सुकामेव्याचे तुकडे घालून, खमंग सुगंध येईपर्यंत चांगले परतवून घ्या. नंतर त्यात साखर आणि वेलची-जायफळ पूड, गुलाबाच्या पाकळ्या, काळी मिरी पूड, सुंठ पूड आणि केशर घाला. त्यात खोबरं आणि पनीर घालून साखर विरघळेपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा. नंतर आच बंद करून मिश्रण गरमागरम सर्व्ह करा.
टीप : शुफ्ता फ्रीजमध्ये ठेवल्यास सात दिवस चांगला टिकतो. मात्र शुफ्ता फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर सर्व्ह करण्यापूर्वी थोडा गरम करा.

 

मिठा खाजा

साहित्य : दीड वाटी मैदा, अर्धा वाटी गूळ, 1 वाटी पाणी, 1 टीस्पून जायफळ पूड, 2 टीस्पून तूप, तळण्यासाठी तूप.
कृती : मैदा आणि जायफळ पूड एकत्र चाळा. गूळ किसून घ्या. त्यावर उकळतं पाणी घालून गूळ विरघळून घ्या. गुळाचं मिश्रण दाट व्हायला हवं. आता या गुळाच्या मिश्रणात चाळलेला मैदा घालून घट्ट कणीक मळून घ्या. त्यास थोडं तूप लावून पुन्हा मळा आणि ओल्या सुती कापडात बांधून तासाभरासाठी बाजूला ठेवून द्या. नंतर या पिठाच्या पातळ पट्ट्या लाटून घ्या किंवा पातळ पोळ्या लाटून त्याच्या सुरीने लांबट पट्ट्या करा. या पट्ट्यांचे वेटोळे करून कडा तूप लावून हलक्या दाबा, म्हणजे सुटणार नाही. या खाजांचा आकार बाकरवडीसारखा होतो. आता गरम तुपात खाजा खमंग तळून घ्या. खाजा गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.