उत्तरेकडचा गोडवा (Sweet Recipes From North)

उत्तरेकडचा गोडवा (Sweet Recipes From North)

मिठे चावल
साहित्य : 2 वाटी सुगंधी बासमती तांदूळ, 4 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 टीस्पून केशर पूड, 2 टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, पाव वाटी तूप.
कृती : उकळत्या पाण्यात बासमती तांदूळ पाच ते सहा मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर पाण्यातून काढून चांगले निथळून घ्या. तांदूळ कोरडे व्हायला हवेत. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात केशर आणि साखर परतवा. नंतर त्यात तांदूळ घालून चांगले परतवा आणि त्यात दूध घाला. भात मोकळा शिजला की, त्यात जायफळ पूड आणि वेलची पूड घालून एकत्र करा. मिठे चावल गरमागरम सर्व्ह करा.

पेढा पराठा
साहित्य : 3 वाटी गव्हाचं पीठ, पाव किलो तांदळाचं पीठ किंवा मैदा, अर्धा किलो ताजे माव्याचे पेढे, अर्धा वाटी पिठीसाखर, 3 टेबलस्पून दुधाचा मसाला, अर्धा वाटी दूध.
कृती : गव्हाचं पीठ, तांदळाची पीठ किंवा मैदा आणि पिठीसाखर एकत्र चाळून घ्या. त्यात पाणी घालून घट्ट कणीक मळा. ताजे माव्याचे पेढे ओलसर असतात, ते कुस्करून त्यात दुधाचा मसाला चांगला एकजीव करा. कणकेच्या गोळ्यात पेढ्याचं सारण भरून अलगद पराठा लाटा. हा पराठा मंद आचेवर खमंग भाजा आणि गरमागरम सर्व्ह करा.
टीप : दिल्लीमध्ये हा पराठा वर्षभर खाल्ला जात असला, तरी होळीदरम्यानही हा आवर्जून केला जातो.

गाजर का हलवा
साहित्य : अर्धा किलो कोवळी गाजर, 2 वाटी साखर, 1 वाटी खवा, अर्धा वाटी दूध पावडर, अर्धा वाटी तूप, पाव वाटी बारीक चिरलेला सुकामेवा.
कृती : गाजर स्वच्छ धुऊन तासून घ्या. नंतर किसून घ्या. जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून, त्यावर सुकामेवा आणि खवा परतवून घ्या. त्यात गाजराचा कीस घालून, मिश्रणाचा रंग बदलेपर्यंत परतवा. नंतर त्यात साखर आणि दूध पावडर घाला. मिश्रण व्यवस्थित आटेपर्यंत परतवत राहा. गाजर व्यवस्थित शिजले की, आच बंद करा. गाजराचा हलवा साधारण थंड करून गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.

फिरनी
साहित्य : दीड वाटी आंबेमोहोर तांदूळ, 4 वाटी दूध, 2 टीस्पून दुधाचा मसाला, अर्धा वाटी साखर, काही गुलाबाच्या पाकळ्या.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा आणि तासाभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर तांदूळ पूर्णतः निथळून बारीक वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करत ठेवा. दुधाला उकळी आली की, त्यात दुधाचा मसाला, साखर आणि तांदळाची पूड घाला. तांदूळ व्यवस्थित शिजून, खीर दाट झाली की, आच बंद करा. गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन या फिरनीवर­­­ घाला आणि सर्व्ह करा.