झुणका भाकर ठेचा (Sunday Special : Zunka Bhakar ...

झुणका भाकर ठेचा (Sunday Special : Zunka Bhakar With Chilli Chutney)

झुणका
साहित्य : अर्धा कप बेसन, 2 कांदे बारीक चिरलेले, 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 कप कोमट पाणी, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : मध्यम आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल घाला आणि त्यात मोहरी-जिर्‍याची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात लसूण घालून परतवा. लसूण सौम्य सोनेरी रंगाची झाली की, त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून परतवा. कांदा पारदर्शक झाला की, त्यात लाल मिरची पूड आणि बेसन घालून मध्यम आचेवर परतवा. बेसन चांगलं भाजून घ्या. त्यात मीठ मिसळून घ्या. नंतर बेसन सतत ढवळत त्यात कोमट पाणी थोडं थोडं करून घाला. बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. साधारण आठ-दहा मिनिटांत बेसनात सर्व पाणी मुरून, ते साधारण कोरडं होईल. आता झाकण लावून पाच मिनिटांकरिता झुणका शिजू द्या. नंतर झाकण काढून आठ-दहा मिनिटं पुन्हा परतवा. शेवटी त्यात कोथिंबीर मिसळा. गरमागरम झुणका, लाल ठेचा आणि तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.
बाजरीची भाकरी
साहित्य : 3 कप बाजरीचं पीठ, पाव कप तीळ, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार कोमट पाणी.
कृती : बाजरीचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून घ्या. त्यात थोडं थोडं कोमट पाणी घालून मऊ पीठ मळा. पिठावर थोडं तूप पसरवून सुती कापडात गुंडाळा आणि दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. मध्यम आचेवर तवा गरम करत ठेवा. पिठाच्या जाडसर भाकर्‍या थापा किंवा लाटा. आता तापलेल्या तव्यावर भाकरी अलगद ठेवा आणि भाकरीवर पाण्याचा हात फिरवा. त्यावर थोडे तीळ भुरभुरून चमच्याने अलगद दाब द्या. एका बाजूने भाकरी शेकली की, अलगद परता आणि दुसर्‍या बाजूनेही शेकून घ्या. नंतर थेट आचेवर दोन्ही बाजूने शेका. गरमागरम भाकरीवर तूप पसरवून भोगीच्या भाजीसोबत सर्व्ह करा.
हिरवा ठेचा
साहित्य : 8-9 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून जिरं, थोडी कोथिंबीर, 8-9 लसणाच्या पाकळ्या, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून तेल.
कृती : सर्व साहित्य एकत्र खलबत्त्यातून ठेचून घ्या किंवा मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.

Zunka Bhakar, झुणका भाकर

कोथिंबीर वडी (Tasty Snack : Kothimbir Vadi)