उंधियो (Sunday Special : Undhiyo)

उंधियो (Sunday Special : Undhiyo)

उंधियो

साहित्य : मेथीच्या मुठियासाठी ः 3 वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, 3 टीस्पून आलं-हिरवी मिरची वाटण, अडीच टीस्पून साखर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, चिमूटभर खायचा सोडा, 3 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कोथिंबीर-खोबर्‍याच्या मसाल्यासाठी : 1 वाटी खोवलेलं खोबरं, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक तृतीयांश वाटी बारीक चिरलेली पातीची लसूण, 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड, 2 टीस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, दीड टीस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून लिंबूरस, स्वादानुसार मीठ.

इतर : 1 वाटी तासलेले लहान बटाटे, 1 मध्यम आकाराचे तुकडे केलेलं कच्चं केळं, 3-4 लहान काळी वांगी, दीड वाटी मध्यम तुकडे केलेली सुरती पापडी, पाऊण वाटी मध्यम आकाराचे कंदाचे तुकडे, पाऊण वाटी मध्यम आकाराचे सुरणाचे तुकडे, पाव वाटी हिरव्या तुरीचे दाणे, 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून ओवा, पाव टीस्पून हिंग, चिमूटभर खायचा सोडा, स्वादानुसार मीठ, 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : मेथीच्या पानांमध्ये थोडं मीठ व्यवस्थित एकत्र करा आणि बाजूला ठेवून द्या. साधारण 5-7 मिनिटांनी मेथीच्या पानांना पाणी सुटेल. ते पाणी काढून घ्या. नंतर मेथीच्या पानांमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, आलं-हिरवी मिरची वाटण, साखर, हळद, लाल मिरची पूड, सोडा आणि 3 टेबलस्पून तेल एकत्र करून मऊ पीठ मळा. आवश्यकता वाटल्यास मेथीमधील काढून ठेवलेलं पाणी, त्यात घाला. आता या पिठाच्या लहान-लहान मुठिया करून गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
कोथिंबीर-खोबर्‍याच्या मसाल्यासाठीचं सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घेऊन एकजीव मिश्रण तयार करा. प्रत्येक लहान बटाट्यांना दोन क्रॉस चिरा द्या. लहान बटाटे नाही मिळाले तर, मोठे बटाटे घेता येतील. त्याचे दोन किंवा तीन भाग करून त्यांनाही दोन क्रॉस चिरा द्या. वांग्यांनाही उभ्या दोन क्रॉस चिरा द्या. त्याचप्रमाणे केळ्यांनाही चिरा द्या. चिर पाडताना तुकडे होणार नाहीत, याची काळजी घ्या. या चिरांमध्ये कोथिंबीर-खोबर्‍याचा अर्धा मसाला व्यवस्थित भरा आणि 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या.
उर्वरित मसाल्यामध्ये पापडी, कंद, सुरण आणि तुरीचे दाणे व्यवस्थित एकत्र करून तेही 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात ओवा, हिंग आणि सोडा घालून मध्यम आचेवर काही सेकंद परतवा. नंतर त्यात बटाटे-वांगी आणि मॅरिनेट केलेल्या इतर भाजा एकत्र करा. त्यात मीठ आणि 2 कप गरम पाणी घालून हलक्या हाताने सर्व एकत्र करा. कुकरला झाकण लावून, मोठ्या आचेवर 2 शिट्या करा.
कुकर थंड झाल्यावर त्यातील सर्व मिश्रण मोठ्या नॉनस्टिक भांड्यात काढा. त्यात भरलेली केळी आणि मेथीच्या मुठिया घालून हलक्या हाताने एकत्र करा. मंद आचेवर केळी शिजू द्या. केळी शिजली की, उंधियो पुन्हा एकदा हलक्या हाताने एकत्र करून कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.