सरसों का साग (Sunday Special : Sarason Ka Saag,...

सरसों का साग (Sunday Special : Sarason Ka Saag, Make Ki Roti)

सरसों का साग

साहित्य : 5 वाटी धुऊन बारीक चिरलेली राईची पानं, 5 वाटी धुऊन बारीक चिरलेली पालकाची पानं, दीड टेबलस्पून चिरलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं,
1 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड,
1 टीस्पून धणे-जिरे पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात राई व पालकाची पानं आणि हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित एकत्र करा आणि मोठ्या आचेवर 4-5 मिनिटं शिजवा. अधूनमधून मिश्रण ढवळत राहा. नंतर चाळणीने पाणी पूर्णतः निथळून घ्या. आता लगेच ही पानं आणि मिरच्या दोनदा थंड पाण्यातून निथळून काढा. पाणी पूर्णतः निथळून 2-3 मिनिटांसाठी थंड व्हायला ठेवा. नंतर अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की, त्यात आलं-लसूण आणि हिंग घालून मध्यम आचेवर अर्धा मिनिट परतवा. आता त्यात कांदा घालून 1-2 मिनिटं परतवा. त्यात राई-पालक पानांचं मिश्रण, हळद, लाल मिरची पूड, धणे-जिरे पूड आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. अधूनमधून ढवळत 2-3 मिनिटं मध्यम आचेवर शिजवत ठेवा. गरमागरम सरसों का साग मक्के कि रोटीसोबत सर्व्ह करा.

मक्के कि रोटी

साहित्य : 1 कप मक्याचं पीठ, स्वादानुसार मीठ, थोडं तांदळाचं पीठ, तेल.
कृती : मक्याच्या पिठात मीठ आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मऊ पीठ मळा. थोडं तांदळाचं सुकं पीठ वापरून या पिठाच्या पोळ्या लाटा आणि तेलावर दोन्ही बाजूने भाजून घ्या.