मेथांबा (Sunday Special: Methamba)

मेथांबा (Sunday Special: Methamba)

मेथांबा

साहित्य : 2 मध्यम कैर्‍या, अर्धा कप चिरलेला गूळ (कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण कमी-जास्त करा), अर्धा टीस्पून मेथीदाणे, 1 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून किंवा चवीनुसार लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी.

कृती : कैर्‍या धुऊन फडक्याने पुसून कोरड्या करा. कैर्‍या तासून, त्यातील बाट किंवा कोय काढून टाका. आता या कैर्‍यांचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करा. पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, हिंग, हळद आणि मेथीदाणे घालून किंचित तपकिरी होईपर्यंत परता. नंतर त्यात कैरीचे चौकोनी तुकडे आणि मिरची पूड घाला. अगदी थोडा वेळ परतून, त्यात पाणी आणि मीठ घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. पॅनवर झाकण ठेवून कैरीचे तुकडे मंद आचेवर शिजू द्या. कैरी शिजली की पॅनमध्ये कडेला करून मध्ये गूळ घाला. चमच्याने गूळ दाबून रसात एकत्र करा. आवश्यक असेल तर त्यात थोडं पाणी घाला (रसाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त ठेवा). मिश्रण व्यवस्थित एकत्र करून, झाकण न ठेवता मंद आचेवर पाच-सहा मिनिटं शिजू द्या. रस पाकाप्रमाणे थोडा घट्ट आणि चिकट झाला पाहिजे. तसा झाला की गॅस बंद करा. थंड झाल्यावर तो अधिक घट्ट होईल. चपाती किंवा पराठ्यासोबत मेथांबा छान लागतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास तो जास्त दिवस टिकतो.