समर स्पेशल आंबा रेसिपीज (Summer Special Mango R...

समर स्पेशल आंबा रेसिपीज (Summer Special Mango Recipes)

अवीट गोडीचा आंबा प्रत्येकाचंच लाडकं फळ. एप्रिल ते जून हा या फळाचा मौसम. खरं तर हा रखरखीत उन्हाचाही मौसम आहे. परंतु, हा उन्हाळाही सुसह्य व्हावा अशा या आंबा आणि कैरीच्या आंबट-गोड पाककृती…

कर्नाटकी कायरस


साहित्य : 2 कप आंब्याच्या ताज्या फोडी, 3 टेबलस्पून तीळ, 4 लाल सुक्या मिरच्या,
2 टेबलस्पून किसलेला ओला नारळ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ, दीड टेबलस्पून गूळ.
फोडणीसाठी साहित्य ः दीड टेबलस्पून तेल, पाऊण टेबलस्पून मोहरी, पाव टेबलस्पून हिंग पावडर, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं.
कृती : ताज्या आंब्याच्या चौकोनी मोठ्या आकाराच्या फोडी करून घ्या. त्यात 3 कप पाणी आणि चवीपुरते मीठ घालून मध्यम आचेवर गरम करा. नंतर पाणी गाळून फोडी बाजूला करा.
एका तव्यावर तीळ आणि चार सुक्या मिरच्या वेगवेगळं खरपूस भाजून घ्या. त्यात थोडंसं पाणी आणि तिखट घालून त्याची मिक्सरमध्ये पातळसर पेस्ट बनवून घ्या. पॅनमध्ये शिजलेल्या आंब्याच्या फोडी, तिळाची पेस्ट, अर्धा कप पाणी, चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजवा. चवीनुसार मीठ वापरा.
आता एका पॅनमध्ये फोडणी तयार करून ती पॅनमधील मिश्रणावर ओता आणि व्यवस्थित एकत्र करा. गरमागरम कर्नाटकी कायरस भाताबरोबर खायला घ्या.

आमरस कढी


साहित्य : 1 कप आमरस किंवा मँगो प्युरी, 1 कप कैरी प्युरी, दीड कप दही, दीड कप पाणी, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, चवीपुरते मीठ.
फोडणीसाठी साहित्य (पहिली) :
अर्धा टेबलस्पून मोहरी, अर्धा टेबलस्पून जिरं, पाव टेबलस्पून मेथी दाणे, 2 टेबलस्पून तेल, कढीपत्ता, हिंग पावडर, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, 3 टेबलस्पून बेसन बुंदी.
फोडणीसाठी साहित्य (दुसरी) :
1 टेबलस्पून तेल, पाव इंच आलं (बारीक चिरून), 2 सुक्या लाल काश्मिरी मिरच्या, 2 टेबलस्पून कढीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून बुंदी.
कृती : दह्यामध्ये थोडेसे पाणी घाला. आता यात आमरस आणि कैरीची प्युरी घालून एकत्र घुसळा किंवा ब्लेंडरने एकजीव करा. कढीचे मिश्रण आता बाजूला ठेवा. पहिल्या फोडणीचं सर्व साहित्य गरम तेलावर चांगले तडतडू द्या आणि गॅस बारीक करून कढीचे मिश्रण त्यात मिसळा. सारखे हलवत राहा. चवीपुरते मीठ घाला.
15-20 मिनिटं शिजल्यानंतर त्यात बुंदी घाला. बाजूने तेल दिसेपर्यंत शिजवा. आता (फोडणी 2) चे सर्व साहित्य वापरून झणझणीत फोडणी तयार करा आणि शिजलेल्या मिश्रणावर ओता. पुरीसोबत आमरस कढीचा आनंद घ्या.

आंबा पापडी


साहित्य : 1 किलो पिकलेले आंबे, पाव किलो साखर, वेलची पूड, तूप.
कृती: सर्व आंब्यांचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवा आणि एका पॅनमध्ये काढा. नंतर त्यात साखर, वेलची पूड मिसळून मिश्रण गॅसवर ठेवा. मंद आचेवर ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
एका थाळीला थोडेसे तूप लावून त्यावर या मिश्रणाचा थर शक्य तितका पातळ पसरवा. दोन दिवस थाळी उन्हात ठेवा. आंबट-गोड आंबा पापडीचे लहान तुकडे करून हवाबंद डब्यात ठेवा. लहान मुलांसह मोठ्यांनाही ही आंबापापडी नक्कीच आवडेल.

आंब्याची चटकदार चटणी


साहित्य : 3 मध्यम आकाराच्या कैर्‍या, 1 पिकलेला आंबा, पाव कप साखर, 2 इंच दालचिनी, 5 ते 6 लवंगा, अर्धा कप व्हिनेगर, 2 इंच आल्याचा तुकडा, 10 लसूण पाकळ्या, 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ.
कृती : कैर्‍यांची सालं काढून फोडी करा. पिकलेल्या आंब्याच्या फोडी करून ठेवा. दालचिनी आणि लवंगांची पूड करा. कैर्‍यांच्या फोडींमध्ये ही पूड मिसळून अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यामध्ये साखर घालून नीट एकत्र करा. आलं आणि लसूण बारीक वाटून घ्या. त्यामध्ये व्हिनेगर घालून त्याची पेस्ट बनवा. आता साखर मिसळलेल्या कैर्‍यांच्या फोडींमध्ये आंब्याच्या फोडी, मीठ, तिखट आणि आलं-लसूण पेस्ट घाला. सर्व नीट एकत्र करून मंद गॅसवर हे मिश्रण नीट शिजू द्या. साखरेचा पाक बनून फोडी शिजल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर
बरणीत भरा.