समर ड्रिंक : रासबेरी पीच आइस टी (Summer Drink :...

समर ड्रिंक : रासबेरी पीच आइस टी (Summer Drink : Raspberry Peach Ice Tea)

उन्हाळ्याच्या मौसमात आपला दिवसभराचा थकवा काही क्षणात घालवायचा असल्यास रासबेरी पीच आइस टी या समर ड्रिंकचा आस्वाद घ्या. गोड आणि टँगी स्वादाचं हे पेय आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. रासबेरी आणि पिच यांपासून बनवलेलं हे पेय तळपत्या उन्हातही तजेलपणाची अनुभूती देतं.

 

साहित्य : फ्रूट सिरप बनवण्यासाठी :

१ कप पाणी, १ कप रासबेरी आणि साखर

दीड कप पीच (बी काढून कापून घ्या.)

चहा बनवण्यासाठी :

३-४ ब्लॅक टी बॅग्ज

८ कप पाणी

कृती :

पॅनमध्ये पाणी, रासबेरी, पीच आणि साखर घालून गरम करा. उकळी आल्यानंतर आच कमी करा. साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित शिजू द्या. नंतर आचेवरून खाली घ्या. २५ -३० मिनिटं झाकून ठेवा. नंतर ते गाळू्न घ्या. रासबेरी आणि पीच व्यवस्थित स्मॅश करून घ्या. आता हा पल्प थंड करण्याकरिता फ्रिजमध्ये ठेवा.

चहा बनवण्यासाठी पॅनमध्ये पाणी आणि टी बॅग घालून ३-४ मिनिटं उकळवून घ्या. आता हा चहा गाळून फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा. १ तासानंतर ब्लॅक टी आणि रासबेरी-पीच पल्प थंड झाला की फ्रिजमधून बाहेर काढा.

एका कपमध्ये ब्लॅक टी घालून त्यात तयार फ्रुट सिरप मिसळा आणि थंडच प्या.