तवा पनीर आणि पनीर पुलाव (Spicy Paneer Recipes)
तवा पनीर आणि पनीर पुलाव (Spicy Paneer Recipes)

तवा पनीर
साहित्य : अर्धा किलो पनीर, 1 वाटी गोड व घट्ट दही, 4 चमचे संकेश्वरी काश्मिरी मिरची ठेचा, स्वादानुसार सैंधव, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लिंबाचा रस, लोणी.
कृती : पनीर कोमट पाण्यात एखादा मिनिट बुडवून ठेवा. नंतर पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करा. दह्यामध्ये सैंधव, जिरेपूड, लिंबाचा रस आणि ठेचा एकत्र करा. पनीरच्या तुकड्यांना हा मसाला चोळून तासाभरासाठी तसेच ठेवून द्या. नंतर तव्यावर लोणी सोडून त्यावर मसाल्यासह पनीर घाला. मंद आचेवर पनीर मसाला परतवून घ्या. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला.
पनीर पुलाव
साहित्य : 1 वाटी किसलेलं पनीर, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी वरीचे तांदूळ, 2 चमचे जिरं, 2 चमचे हिरवं तिखट, 2-3 ताजी आमसुलं, पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचा जाडसर कूट, स्वादानुसार सैंधव, तूप.
कृती : वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन कापडावर निथळून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर जिरं, हिरवं तिखट आणि आमसुलं परतवा. त्यात दाण्यांचा कूट, पनीर आणि ओलं खोबरं घालून खमंग परतवून घ्या. नंतर त्यात वरीचे तांदूळ घालून थोडं परतवा. त्यात 6 वाटी गरम पाणी घाला. एक उकळी आल्यानंतर त्यात सैंधव एकत्र करा. झाकण लावून तांदूळ शिजू द्या. पाणी पूर्णतः आटून तांदूळ सुटा झाला की, आच बंद करा. पनीर पुलाववर साजूक तूप घालून सर्व्ह करा.