होळीसाठी गोडधोड पदार्थ (Special Sweets For Holi)

होळीसाठी गोडधोड पदार्थ (Special Sweets For Holi)

थंडाई
साहित्य : 10-15 बदाम, 2 टेबलस्पून टरबुजाच्या बिया, 2 टेबलस्पून मनुका, 1 टेबलस्पून बडीशेप, 10-12 काळी मिरी, 5 हिरव्या वेलच्या, 2 कप दूध, 2 टेबलस्पून साखर, 1 कप थंड पाणी, 4-5 बर्फाचे खडे.
कृती : टरबुजाच्या बियांची सालं काढून, पाच-सहा तास भिजत ठेवा. बदाम, मनुका, काळी मिरी, वेलची वेगवेगळी पाच-सहा तास भिजत ठेवा. बडीशेप सहा-सात तास भिजत ठेवा. बदामाची सालं काढून घ्या. भिजवलेलं सर्व साहित्य निथळून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात 1 कप थंड पाणी मिसळून पुन्हा मिक्सरमधून फिरवा. हे मिश्रण गाळून त्यात दूध आणि स्वादानुसार साखर मिसळा. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे खडे घालून, त्यावर थंडाई घाला आणि थंडगार सर्व्ह करा.
टीप : मनुकांचा गोडपणा लक्षात घेऊन थंडाईमध्ये साखर मिसळा.

स्वीट एन्व्हलप
साहित्य : पिठासाठी : 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप दूध.
सारणासाठी : 1 कप सफरचंदाचे बारीक तुकडे, 1 केळं बारीक चिरलेलं, 2 स्ट्रॉबेरी बारीक चिरलेली, 1 कप पपईचे बारीक तुकडे, अर्धा कप डाळिंबाचे दाणे, 2 टेबलस्पून बारीक वाटलेली साखर, 2 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क,2 टेबलस्पून साजूक तूप.
कृती : गव्हाच्या पिठात आवश्यकतेनुसार दूध मिसळून पुरीसारखं घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ झाकून 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. नंतर त्याच्या पोळ्या लाटून, भाजून घ्या. एका मोठ्या वाडग्यात सर्व फळं घेऊन त्यात साखर एकजीव करा आणि पाच मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या.आता तवा गरम करून आच मंद करा. तव्यावर पोळी एका बाजूने थोडी गरम करून परतवा. त्यावर मध्यभागी फळाचे तुकडे ठेवा आणि पोळी चारही बाजूने एन्व्हलपप्रमाणे बंद करा. सर्व बाजूने तूप सोडून हे एन्व्हलप दोन्ही बाजूने कुरकुरीत सोनेरी रंगात भाजून घ्या. आता सर्व्हिंग डिशमध्ये हे एन्व्हलप ठेवून त्यावर कंडेन्स्ड मिल्क पसरवा. स्वीट एन्व्हलप गरमागरम सर्व्ह करा.

थंडाई लस्सी
साहित्य : थंडाई पुडीसाठी : 10-15 बदाम, 2 टेबलस्पून टरबुजाच्या बिया, 2 टेबलस्पून मनुका, 1 टेबलस्पून बडीशेप, 10-12 काळी मिरीची पूड, 5 हिरव्या वेलचीची पूड.
इतर : 1 कप ताजं दही, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून मलई.
कृती : बडीशेप आणि साखर मिक्सर मधून एकत्र बारीक वाटून घ्या. नंतर चाळणीने चाळून घ्या. चाळलेल्या मिश्रणात बदाम, टरबुजाच्या बिया, वेलची पूड आणि काळी मिरी पूड घालून पुन्हा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. ही पूडही चाळणीने चाळून घ्या. चाळणीत राहिलेला चोथा पुन्हा मिक्सरमधून फिरवा आणि पुन्हा चाळून घ्या. ही तयार झाली थंडाईची पूड. ही पूड कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास 15 ते 20 दिवस चांगली टिकते. आता लस्सी तयार करण्यासाठी ताजं आणि घट्ट दही मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात मनुका घालून पुन्हा एकदा फिरवा. आता या मिश्रणात एक ग्लास लस्सीसाठी 2 टेबलस्पून या प्रमाणात थंडाईची पूड घालून, पुन्हा मिक्सर फिरवा. हवं असल्यास, यात बर्फाचा चुरा घालूनही फिरवता येईल. थंडगार लस्सी सर्व्हिंग ग्लासमध्ये घालून त्यावर मलई घाला आणि सर्व्ह करा.
टीप : थंडाई पूड आगाऊ तयार करून ठेवल्यास, अगदी पाच-सात मिनिटांत स्वादिष्ट थंडाई लस्सी तयार करता येते.

ब्रेड मालपोहा
साहित्य : साखरेच्या पाकासाठी : 2 कप साखर, 1 टीस्पून वेलची पूड, 1 कप पाणी.
सारणासाठी : 1 कप मावा, अर्धा कप सुकामेव्याचे तुकडे, 2 टेबलस्पून बारीक वाटलेली साखर.
इतर : 10 ब्रेडच्या स्लाइसेस, अर्धा कप दूध, तळण्यासाठी साजूक तूप, 1 टीस्पून केशर.
कृती : प्रत्येक ब्रेड स्लाइसेसच्या कडा कापून घ्या. आता एका जाड बुडाच्या भांड्यात 1 कप पाणी आणि साखर घेऊन एकतारीपेक्षा थोडा पातळ पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून बाजूला ठेवून द्या. एका भांड्यात सारणासाठीचं सर्व साहित्य घेऊन एकजीव मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवून द्या. कढईत तळण्यासाठी तूप गरम करत ठेवा. ब्रेडच्या स्लाइसेस गोलाकार करून घ्या. आता एका भांड्यात दूध घेऊन, त्यात कडा काढलेले ब्रेडचे स्लाइस बुडवून पूर्णतः भिजवून घ्या. नंतर दाबून त्यातील अतिरिक्त दूध काढा. अशा एका स्लाइसवर मावा-सुकामेव्याचं मिश्रण पसरवून त्यावर दुधात बुडवलेली ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवा आणि कडा दाबून बंद करा. हा ब्रेडचा मालपोहा लगेच तुपात सोनेरी रंगावर तळून घ्या. अशा प्रकारे एकेक मालपोहा तयार करून तुपात तळून साखरेच्या पाकात सोडा. साधारण 10-12 मिनिटांनंतर ते साखरेच्या पाकातून काढून सर्व्हिंग डिशमध्ये ठेवा. त्यावर केशराच्या काड्या घाला आणि गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.
टीप : ब्रेड दुधात बुडवून त्यातील अतिरिक्त दूध दाबून काढल्यानंतर पुढची कृती पटापट करा. नाहीतर ब्रेड कोरडे होतील आणि त्याच्या कडा एकमेकांना चिकटणार नाहीत. यामुळे मालपोहा तुपात तळण्यासाठी सोडल्यानंतर उघडण्याची शक्यता आहे. तेव्हा ही दक्षता जरूर घ्या.

फिरनी
साहित्य : दीड वाटी आंबेमोहोर  तांदूळ, 4 वाटी दूध, 2 टीस्पून दुधाचा मसाला, अर्धा वाटी साखर, काही गुलाबाच्या पाकळ्या.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा आणि तासाभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर तांदूळ पूर्णतः निथळून बारीक वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करत ठेवा. दुधाला उकळी आली की, त्यात दुधाचा मसाला, साखर आणि तांदळाची पूड घाला. तांदूळ व्यवस्थित शिजून, खीर दाट झाली की, आच बंद करा. गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन या फिरनीवर घाला आणि सर्व्ह करा.

मिठाई श्रीखंड
साहित्य : 1 कप शिल्लक राहिलेल्या कोणत्याही मिठाया (रसमलाई, काजू कतली, अंजीर बर्फी, अक्रोड बर्फी इत्यादी काहीही एकत्र केलेलं), 2 कप दही, अर्धा कप बारीक वाटलेली साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून केशर (चमचाभर दुधात अर्धा तास भिजवलेलं).
कृती : दही तलम कापडात बांधून, रात्रभर लटकवून ठेवा, म्हणजे सकाळपर्यंत त्यातील सर्व पाणी निघून जाईल. नंतर सर्व मिठाया अगदी बारीक कुस्करून घ्या. रसमलाई घेत असल्यास, दाबून त्यातील जास्तीचे पाणी काढा आणि नंतर कुस्करा. एका भांड्यात घट्ट दही घेऊन त्यात वाटलेली साखर घाला आणि पाच-दहा मिनिटं चांगलं फेटा. नंतर त्यात मिठायांचा चुरा, वेलची पूड आणि केशर मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करा. हे मिश्रण दोन-तीन तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर थंडगार मिठाई श्रीखंड गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.
टीप : मिठायांमध्ये सुकामेवा नसल्यास, तुम्ही या श्रीखंडात सुकामेव्याचे कापही घालू शकता.

होळी रे होळी (Recipes For Holi)