आंब्याचे खास पदार्थ (Special Mango Recipes)

आंब्याचे खास पदार्थ (Special Mango Recipes)

 

मँगो फिरनी

साहित्य : 1 लीटर दूध, 4 टेबलस्पून भिजवून पाणी निथळून घेतलेले तांदूळ, 1 पाकीट फिरनी मिक्स, 300 ग्रॅम साखर, 3 आंबे (चौकोनी तुकडे केलेले), 1 टीस्पून वेलची पूड, 10 बदाम काप केलेले, 10 पिस्ते काप केलेले.

कृती : एका पॅनमध्ये दूध मंद आचेवर उकळत ठेवा. ते वारंवार ढवळत राहा. तांदूळ मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. आता उकळलेल्या दुधात तांदळाचं वाटण, साखर आणि फिरनी मिक्स घालून, दाट होईपर्यंत शिजवा. दाट झालं की, आचेवरून उतरवून त्यात आंब्याचे तुकडे घाला. नंतर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. थंडगार फिरनी वेलची पूड आणि बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा आणि सर्व्ह करा.

 

मँगो कस्टर्ड


साहित्य : अर्धा किलो आंब्याचा गर, अर्धा लीटर दूध, स्वादानुसार साखर, 60 ग्रॅम व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर, 100 ग्रॅम फ्रेश क्रीम.

कृती : 1 टेबलस्पून थंड दुधात कस्टर्ड पावडर चांगलं एकजीव करून घ्या. उर्वरित दूध उकळवत ठेवा. दूध उकळलं की, त्यात कस्टर्ड पावडरचं मिश्रण मिसळा. दूध सतत ढवळत, मिश्रण चांगलं एकजीव करा. नंतर त्यात साखर मिसळून पॅन आचेवरून खाली उतरवा. कस्टर्ड थंड झाल्यानंतर त्यात आमरस आणि फ्रेश क्रीम मिसळा. नंतर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. सेट झालेलं कस्टर्ड थंडगार सर्व्ह करा.

 

बेक्ड मँगो योगर्ट


साहित्य : 200 मिलिलीटर फ्रेश क्रीम, 400 मिलिलीटर कंडेंस्ड मिल्क, 250 ग्रॅम दही, 50 ग्रॅम आमरस.

कृती : ओव्हन 150 डिग्रीवर प्रीहिट करा. सर्व साहित्य एका बाऊलमध्ये चांगलं एकजीव करून घ्या. हे मिश्रण ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये घालून 15 मिनिटं बेक करत ठेवा. नंतर सर्व्ह करा.

 

मँगो कुल्फी


साहित्य : दीड लीटर दूध, पाऊण कप साखर, 1 कप आंब्याचा गर, पाव कप फ्रेश क्रीम.

कृती : दूध मंद आचेवर प्रमाण अर्ध होईपर्यंत शिजवा. आता त्यात साखर मिसळून अजून 10 मिनिटं शिजवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी वेगळं ठेवून द्या. यात आंब्याचा गर आणि फ्रेश क्रीम मिसळून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये भरून सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.