कैरीच्या रेसिपीज (Special K...

कैरीच्या रेसिपीज (Special Kairee Recipes)

वाटली डाळ


साहित्य : 2 कप हरभरा डाळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 सुक्या लाल मिरच्या, अर्धा कप किसलेली कैरी, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी साहित्य ः 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरं, थोडी हिंग पावडर, हळद.
कृती : कमीत कमी चार तास हरभरा डाळ पाण्यात भिजवून ठेवा. डाळ पाण्यातून काढल्यानंतर चार ते पाच टेबलस्पून डाळ बाजूला काढून ठेवा. नंतर उरलेली डाळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, किसलेली कैरी, आल्याचा तुकडा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ टाका. आता हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये ही डाळ काढून त्यामध्ये आधीच बाजूला काढून ठेवलेली अख्खी डाळ मिक्स करा. त्यामुळे डिश शोभिवंत दिसेल. नंतर फोडणीचं सर्व साहित्य वापरून आणि 4 सुक्या लाल मिरच्या टाकून खमंग फोडणी करा.
बाऊलमधील मिश्रणावर ही फोडणी घाला नि मिसळा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून ही ‘वाटली डाळ’ सजवा. घरातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल अशी ही ‘वाटली डाळ’ मनमुराद खा.

कैरी भात


साहित्य : 2 कप तांदूळ, 2 कैर्‍या, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 कढिलिंबाची पानं, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरं, 1 टीस्पून हिंग पावडर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून हळद, मीठ (चवीनुसार).
कृती : प्रथम तांदूळ शिजवून भात मोकळा करून घ्या. कैर्‍या किसून त्यातील पाव कीस वेगळा काढून ठेवा. गॅसवर पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घालून मोहरी, जिरं आणि हिंग घाला. त्यावर उडीद डाळ घालून लालसर रंगाची होईपर्यंत परतून घ्या. नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढिपत्त्याची पानं आणि लाल सुक्या मिरच्या टाकून थोडे हलवा. ह्या खमंग फोडणीमध्ये आता मोकळा शिजवलेला भात आणि कैरीचा कीस घाला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नीट एकत्र करा. पॅनवर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा. तयार झालेल्या भाताला एका थाळीमध्ये काढून घ्या. आता बाजूला काढून ठेवलेला कैरीचा कीस त्यामध्ये मिसळा. नीट एकत्र करून बाऊलमध्ये काढा. चविष्ट कैरी भात तयार आहे. चिरलेली कोथिंबीर पसरून सजावट करा.