शिंगाड्याचा समोसा (Shingada Samosa)

शिंगाड्याचा समोसा (Shingada Samosa)

शिंगाड्याचा समोसा

साहित्यः १२०ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, पाव कप आरारुट पावडर, ६० ग्रॅम तूप, अडीच कप पाणी, १ टीस्पून सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

सारणासाठीः १२५ ग्रॅम चारोळी (२ तास पाण्यात भिजवून ठेवा), पाऊण टीस्पून लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून जिरं, २ टीस्पून धनेपूड, २ टीस्पून सैंधव मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, ३० ग्रॅम तूप.

कृतीः भिजवलेल्या चारोळीची सालं काढून ती मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून ते गरम होऊ द्या. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की त्यात चारोळीची पेस्ट आणि उरलेले सर्व साहित्य घाला. मंद आचेवर ठेवून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊ द्या. नंतर खाली उतरवून थंड करा.

समोसा कव्हर बनविण्यासाठीः एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात तूप आणि १ टीस्पून मीठ घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात शिंगाड्याचं पीठ आणि आरारुट पावडर घाला आणि नीट एकत्र करा. मंद आचेवर ठेवून ते पीठ चांगले एकजीव होऊ द्या. नंतर गॅस बंद करा आणि पीठ चांगलं मळून घ्या. पीठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. गोळ्याची पुरी लाटा व तिचे दोन समान भाग कापा. एका भागाच्या सपाट बाजूला पाण्याचं बोट लावा आणि दोन्ही कडा एकत्र जुळवून त्याचा कोन बनवा. कोन मध्ये तयार सारण भरून कोन बंद करा. सर्व गोळ्यांचे असे समोसे बनवून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम होऊ द्या आणि त्यात समोसे सोनेरी रंग येईस्तोवर तळा. गरमगरम समोसा सर्व्ह करा.