आंबा खाण्याचा बहाणा (Recipes In Mango Season)

आंबा खाण्याचा बहाणा (Recipes In Mango Season)

आंबा खाण्याचा बहाणा शोधणार्‍यांसाठी हा प्रपंच आहे. सकाळीच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणानंतरच्या डेझर्टपर्यंत प्रत्येक पदार्थात आंब्याचा अंतर्भाव कसा होईल, ते सांगण्याचा हा प्रयत्न… आंब्याचा हा मौसम दिवसभर साजरा करण्यासाठी याची मदत होईल, एवढीच अपेक्षा.

मँगो अँड बनाना स्मूदी
साहित्य : 2 आंब्यांचा गर, 2 केळ्यांचा गर, 2 कप थंड दही, 2 कप दूध, स्वादानुसार साखर.
कृती : सर्व साहित्य एकत्र ब्लेंडरमध्ये घालून अगदी बारीक करून घ्या. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये घालून थंडगार सर्व्ह करा.

मँगो पॅना कोटा
साहित्य : एका आमरस, 1 कप नारळाचं दूध, 1 कप फ्रेश क्रीम, 4-5 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून जिलेटिन, अर्धा टीस्पून व्हेनिला इसेन्स, सजावटीसाठी पुदिन्याची पानं.
कृती : पाव कप कोमट पाण्यात जिलेटिन मिसळून चांगलं एकजीव करा. 15 मिनिटांकरिता हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
एका पॅनमध्ये नारळाचं दूध, फ्रेश क्रीम आणि साखर मिसळून गरम करा; मात्र मिश्रणाला उकळी येण्यापूर्वी हा पॅन आचेवरून खाली उतरवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात आमरस, व्हॅनिला इसेन्स आणि भिजवलेलं जिलेटिन घालून चांगलं एकजीव करा. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये हे मिश्रण भरून चार तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यावर पुदिन्याची पानं सजवून सर्व्ह करा.

मँगो संदेश
साहित्य : 1 कप आमरस, दीड लीटर दूध, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप दुधाची पूड, चिमूटभर केशर, सजावटीसाठी पिस्त्याचे काप.
कृती : 1 टीस्पून दुधात केशर भिजवून ठेवा. चक्का तयार करण्यासाठी पॅनमध्ये दूध गरम करा. दुधाला उकळी आली की, त्यात लिंबाचा रस घालून दोन-तीन मिनिटं शिजवा. दूध व्यवस्थित फाटलं की, आचेवरून उतरवा. आता हे दूध सुती कापडातून व्यवस्थित गाळून घ्या. सुती कापडात उरलेला चक्का, तसाच कापडात बांधून सहा-सात तासांसाठी लटकवून ठेवा. यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी संपूर्णतः निघून जाईल. अशा प्रकारे चक्का तयार झाला आहे.
आता हा चक्का हलक्या हाताने व्यवस्थित स्मॅश करा. त्यात पिठीसाखर मिसळून पुन्हा दोन मिनिटं स्मॅश करा. चक्क्याचं हे मिश्रण, आमरस आणि दुधाची पूड चांगलं एकजीव करून, एका पॅनमध्ये मंद आचेवर शिजवत ठेवा. साधारण 10-12 मिनिटं ते मंद आचेवर शिजू द्या. मिश्रण चांगलं एकजीव झालं की, पॅन आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या. नंतर या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून, पेढ्यांसारखे थोडे चपटे करा. त्यावर ब्रशच्या साहाय्याने केशराचं मिश्रण पसरवा, पिस्त्याचे काप लावून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.