होळी रे होळी (Recipes For Holi)

होळी रे होळी (Recipes For Holi)

होळी म्हणजे पुरणपोळी हे समीकरण अगदी पक्क आहे. पण पुरणपोळीचा स्वाद घेतानाच अन्य काही छान छान पदार्थांनी हा रंगांचा सण साजरा करता येईल. त्याचा हा स्वादिष्ट नजराणा…..
पुरण पोळी
साहित्य : 4 वाटी चणा डाळ, 3 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी तेल.
कृती : गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र चाळून, एकदम मऊ पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यावर सर्व खड्डे भरतील इतकं तेल घालून किमान दोन तासांकरिता हे पीठ तसंच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगलं मळून घ्या. चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चाळणीतून गाळून त्यातील जास्तीचं पाणी बाजूला काढून ठेवा. (या जास्तीच्या पाण्यालाच ‘डाळीचा कट’ म्हणतात. त्यासाठी मुद्दामहून जास्त पाणी घालून डाळ शिजवा.) कढईमध्ये शिजलेली चण्याची डाळ आणि गूळ घालून पूर्णतः कोरडी होईपर्यंत शिजवा. आवडत असल्यास त्यात स्वादानुसार वेलदोड्यांची किंवा जायफळ पूड घाला. हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या. पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
पिठाचा लिंबाच्या आकाराचा आणि पुरणाचा त्याच्या दुप्पट आकाराचा गोळा तयार करा. पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात पुरणाचा गोळा घालून बंद करा. हा गोळा हाताच्या तळव्यावर ठेवून अलगद दाबा. नंतर तांदळाचं भरपूर पीठ लावून पोळी लाटा. पोळी लाटताना अधूनमधून हातावर घेऊन पोळपाटाला चिकट नाही, याची खात्री करून घ्या. पोळी लाटतानाही त्यास मधूनमधून तांदळाचं पीठ लावत राहा. तवा अगदी मंद आचेवर गरम करा. पोळीवर तळहात ठेवून पोळपाट उलटं करा आणि ही पोळी अलगद गरम तव्यावर ठेवा. पोळी मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम पुरण पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करा.

 

ड्रायफ्रुट पुरणपोळी
साहित्य : सारणासाठी : अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम, अर्धा कप पिस्ता, 2 टेबलस्पून खोबर्‍याचा कीस, 1 टेबलस्पून वेलची पूड, अर्धा टेबलस्पून जायफळ पूड, अर्धा कप पिठीसाखर.
पिठासाठी : 1 कप मैदा, 1 कप साजूक तूप, चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध.
कृती : सर्वप्रथम काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात खोबरं, वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. त्यात पिठीसाखर मिसळून मिश्रण 15 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. आता एका परातीमध्ये मैदा, मीठ आणि 2 चमचे साजूक तूप एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार दूध मिसळून घट्ट पीठ मळा. हे पीठ 15 मिनिटांकरिता झाकून बाजूला ठेवून द्या. आता सारणामध्ये थोडं तूप आणि दूध घालून ते एकसंध होईल अशा प्रकारे मळा. आता मैद्याची जाडसर पुरी लाटून त्यावर सारणाचा गोळा ठेवून, पुन्हा गोळा तयार करा. त्या गोळीच्या जाडसर पुरणपोळ्या लाटून घ्या. या पुरणपोळ्या गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. पोळी आचेवरून खाली उतरवल्यावर त्यावर दोन्ही बाजूने तूप पसरवा. स्वादिष्ट ड्रायफ्रुट पुरणपोळी तयार.
टीप : सारण एकसंध करण्यासाठी केवळ दूध किंवा केवळ तूपही घालता येईल. मात्र दूध आणि तूप समप्रमाणात घातल्यास चव छान येते.

कटाची आमटी
साहित्य : 1 कप चणा डाळ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून तेल, आवश्यकतेनुसार पाणी.
फोडणीसाठी : अर्धा कप बारीक किसलेलं खोबरं, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 1 टेबलस्पून किसलेला गूळ, 10-12 काळी मिरी, 2 हिरव्या वेलच्या, 1 तमालपत्र, 1 दालचिनीची काडी, 2 टेबलस्पून तेल, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : चणा डाळ स्वच्छ करून सहा-सात तास भिजत ठेवा. नंतर चणा डाळीत हळद व तेल घालून, कटासाठी आवश्यक तेवढं पाणी घाला आणि आठ-नऊ शट्या काढा. कुकर थंड झाल्यानंतर त्या मिश्रणातील सर्व पाणी आणि साधारण दोन कप डाळीचं दाट मिश्रण कटासाठी वेगळं काढून घ्या. उर्वरित दाट मिश्रण पुरणपोळी करण्यासाठी वापरा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, काळी मिरी घालून चांगलं परतवून घ्या. नंतर त्यात मोहरी घालून तडतडली की, जिरं घाला. जिर्‍याचा खमंग सुगंध आल्यावर त्यात हळद, लाल मिरची पूड आणि गरम मसाला मिसळा. नंतर कटासाठीचं मिश्रण घालून, त्यास तीन-चार चांगल्या उकळ्या येऊ द्या. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ, खोबरं आणि मीठ मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून पाच-सहा मिनिटं उकळू द्या. गरमागरम कटाची आमटी पुरणपोळीसोबत सर्व्ह करा.

बेसन गुजिया
साहित्य : पिठासाठी : 1 कप मैदा, 2 टेबलस्पून साजूक तूप, अर्धा कप दूध.
सारणासाठी : 75 ग्रॅम बेसन, अर्धा कप बारीक वाटलेली साखर, अर्धा कप साजूक तूप, अर्धा कप सुकामेव्याचे बारीक काप, 1 टेबलस्पून चारोळी, 1 टीस्पून वेलची पूड, तळण्यासाठी साजूक तूप, 2 टेबलस्पून बारीक किसलेलं खोबरं.
कृती : परातीमध्ये मैदा आणि गरम तुपाचं मोहन घालून व्यवस्थित एकत्र करा. नंतर चांगलं मळून घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार दूध मिसळून पुरीप्रमाणे घट्ट पीठ मळा. हे पीठ झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्या. एका कढईत तूप घालून त्यात बेसन खमंग भाजून घ्या. साधारण 10-12 मिनिटांत बेसन व्यवस्थित भाजून होईल. नंतर त्यात बदाम, काजू, मनुका आणि चारोळी घालून एक-दोन मिनिटं चांगलं परतवा. नंतर आच बंद करून हे मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्या.
आता झाकून ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळा. त्याचे लहान-लहान गोळे तयार करून ठेवा. बेसन थंड झालं की, त्यात खोबरं आणि वेलची पूड घालून एकजीव करा. एका कढईत मंद आचेवर तळण्यासाठी तूप गरम करत ठेवा. पिठाच्या एकेका गोळीची लहान पुरी लाटून, त्याच्या मध्यभागी सारण भरा आणि करंजीप्रमाणे दुमडा. एकेक करंजी गरम तुपात अलगद सोडून सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा. करंजी पूर्णतः थंड करून स्वच्छ-कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास काही दिवस उत्तम टिकते.

आलू मसाला पुरी
साहित्य : 2 कप गव्हाचं पीठ, 3 बटाटे (उकडून बारीक किसलेले), 1 टेबलस्पून गरम मसाला, 4-5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून बडीशेप पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : परातीमध्ये गव्हाचं पीठ, उकडलेल्या बटाट्यांचा कीस, गरम मसाला, मिरची पेस्ट, मीठ, हळद, हिंग, धणे पूड, लाल मिरची पूड, बडीशेप पूड आणि थोडं तेल घालून घट्ट पीठ मळा. हे पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. नंतर पिठाच्या लहान-लहान पुर्‍या लाटून गरम तेलात सोनेरी रंगावर भाजून घ्या. गरमागरम आलू मसाला पुरी हिरवी चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.

कांजी वडा
साहित्य : कांजीसाठी : 10 कप पाणी,1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून (स्वादानुसार) मीठ, 1 टेबलस्पून सैंधव, 2 टेबलस्पून मोहरी, तळण्यासाठी तेल.
वड्यासाठी : 1 कप मूगडाळ, स्वादानुसार मीठ, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टेबलस्पून तेल.
कृती : कांजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन, त्यात हिंग, हळद, लाल मिरची पूड, सैंधव आणि मीठ चांगलं एकजीव करा. हे मिश्रण पाच-सहा तास झाकून ठेवा. मोहरी मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार तेल घालून व्यवस्थित फेटून घ्या. ही चांगली फेसलेली मोहरीही पाण्याच्या मिश्रणात एकजीव करा आणि अजून एक दिवस उष्ण जागेवर ठेवा. वडा तयार करण्यासाठी मूगडाळ स्वच्छ निवडून, पुरेशा पाण्यात तीन-चार तास भिजत ठेवा. नंतर निथळून बारीक वाटून घ्या. त्यात मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि तेल घालून एकजीव मिश्रण तयार करा. गरम तेलात या मिश्रणाचे वडे तळून घ्या. तळलेले वडे कांजीच्या मिश्रणात घालून एक दिवस बाजूला ठेवून द्या. दुसर्‍या दिवशी कांजी वडे खाण्यास घ्या.कांजी वडा हा राजस्थानी-गुजराती पारंपरिक पदार्थ आहे. अतिशय चविष्ट लागतो.

होळीसाठी गोडधोड पदार्थ (Special Sweets For Holi)