करा शानदार पाहुणचार (Recipes for Guests)

करा शानदार पाहुणचार (Recipes for Guests)

अतिथी देवो भव!…
ही आदरातिथ्याची भारतीय संस्कृती जगात वेगळी आहे. यानुसार घरी येणार्‍या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य उत्तमच व्हायला हवं. त्यासाठी अर्थातच शानदार पदार्थांची रेलचेल हवी!

बटाटा-खवा-ड्रायफ्रूट्स टिक्की
साहित्य आवरणासाठी : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, 50 ग्रॅम खवा किसलेला, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, पाव कप भाजलेलं बेसन, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर वेलची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ.
सारणासाठी : पाव कप काजू, बदाम, अक्रोडाचे बारीक तुकडे, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून चाट मसाला, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून तूप.
कृती : आवरणासाठीचं सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून मळून घ्या आणि बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू, अक्रोड आणि बदामाचे तुकडे क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्या. नंतर ते सारणासाठीच्या उर्वरित साहित्यामध्ये मिसळून, मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या. आता आवरणाच्या मिश्रणाची वाटी तयार करून त्यात सारण भरा आणि टिक्क्या तयार करून घ्या. या टिक्क्या तुपामध्ये सोनेरी रंगावर शॅलोफ्राय करून घ्या. गरमागरम टिक्क्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

अप्पम
साहित्य : 1 कप चणा डाळ, एक तृतीयांश कप रवा, पाव कप दही, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, एक तृतीयांश कप खोवलेलं खोबरं, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून खायचा सोडा, स्वादानुसार मीठ, पाव कप बारीक चिरलेले काजू, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : चणा डाळ सहा तास भिजत ठेवा. नंतर बारीक वाटून घ्या. आता तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. अप्पमच्या साच्याला आतून थोडं तेल चोळून घ्या. आता यात अप्पमचं मिश्रण भरून,
ते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. गरमागरम अप्पम खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टीप : अप्पमचा साचा नसल्यास मिश्रणाचे लहान लहान गोळे गरम तेलात सोडून भजी तळून घ्या.

काश्मिरी वडा
साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेले मटार, अर्धा कप मावा, 2 बटाटे उकडून कुस्करलेले,  पाव कप पुदिन्याची पानं बारीक चिरलेली,  1 अननसाची चकती बारीक चिरलेली, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
2-3 टेबलस्पून बदामाचे काप, 2 टेबलस्पून पिस्त्याचे काप, 1 टीस्पून गरम मसाला,  2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, पाव कप भाजलेलं बेसन, 1 टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : एका वाडग्यात तेलाव्यतिरिक्त सर्व
साहित्य घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्या.
या मिश्रणाच्या चपट्या वड्या तयार करा. कढईत तेल गरम करून वडे सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम काश्मिरी वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

बादशाही कबाब
साहित्य : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, 50 ग्रॅम पनीर किसलेलं, अर्धा कप ब्रेड क्रम्स, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून टुटी-फ्रुटी,
1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, 1 कप मिश्र भाज्या (गाजर, फरसबी, मका, मटार इत्यादी), एका लिंबाचा रस, पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेला कांदा, आवश्यकतेनुसार रवा किंवा ब्रेडक्रम्स, तळण्यासाठी तेल आणि स्वादानुसार मीठ.
कृती : भाज्या बारीक चिरून कुकरमधून शिजवून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता तेल आणि रवा किंवा ब्रेडक्रम्स सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्या. या मिश्रणाच्या हृदयाच्या आकाराच्या वड्या तयार करा. हे कटलेट रवा किंवा ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम बादशाही कटलेट्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

पनीर खुशनुमा
साहित्य : 250 ग्रॅम पनीर (मोठे चौकोनी तुकडे केलेले), 1 टेबलस्पून सुंठ पूड, 1 टीस्पून रोजमेरी पूड (बाजारात उपलब्ध), 2 टेबलस्पून काजू पेस्ट, अर्धा कप फेटलेलं ताजं व घट्ट दही, थोडं किसलेलं चीज,  प्रत्येकी 1 टीस्पून लाल मिरची पूड आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, काही किवी फळाचे स्लाइस, स्वादानुसार मीठ.
कृती : एका बाऊलमध्ये दही, काजू पेस्ट, चीज, सुंठ पूड, रोजमेरी पूड, मीठ लाल मिरची पूड, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ एकत्र करून घेऊन एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणात पनीरचे तुकडे अर्ध्या तासाकरिता मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. नंतर हे पनीरचे तुकडे ग्रील करण्याच्या सळीमध्ये रोवून तंदूरमध्ये ग्रील करा. गरमागरम पनीर खुशनुमा किवीच्या स्लाइसेसने सजवून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

व्हेज गोल्ड कॉइन
साहित्य : 2 ब्रेडचे स्लाइस
(गोलाकार कापून घ्या), अर्धा कप उकडलेल्या मिश्र भाज्या (फ्लॉवर, कोबी, फरसबी इत्यादी), 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 उकडलेला बटाटा, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), थोडे पांढरे तीळ, स्वादानुसार मीठ व पांढरी मिरी पूड, तळण्याकरिता तेल.
कृती : सर्व भाज्या, बटाटा, हिरव्या मिरच्या, मीठ, मिरी पूड आणि कॉर्नफ्लोअर यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवा आणि ब्रेडच्या कडा दाबून बंद करा. त्यावर तीळ भुरभुरून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.

काजू-पिस्ता रोल
साहित्य : 1 कप काजूची पूड, 1 कप पिस्त्याची पूड, 1 चिमूट खायचा हिरवा रंग, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.
साखरेच्या पाकासाठी : अर्धा कप साखर, पाव कप पाणी, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून पुन्हा एक उकळी आणा आणि आच बंद करा. साखरेच्या पाकाचे दोन समान भाग करा. आता एका भागात काजूची पूड मिसळा आणि चांगलं मळून घ्या. साखरेच्या पाकाच्या दुसर्‍या भागात पिस्त्याची पूड आणि हिरवा रंग एकजीव करून तेही मळून घ्या. आता पिस्त्याच्या गोळ्याचे लांबट लहान रोल करा. त्यावर काजूचं मिश्रण गुंडाळून रोल तयार करून घ्या. त्यावर चांदीचा वर्ख गुंडाळून तासभर बाजूला ठेवून द्या. नंतर या रोलचे साधारण एक इंच आकाराचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.
टीप : काजू-पिस्ता रोल चार दिवस चांगला टिकतो. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

पनीर कॉर्न चीज बॉल्स
साहित्य : 200 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 100 ग्रॅम अमेरिकन कॉर्न (मक्याचे मोठे दाणे), 150 ग्रॅम किसलेलं चीज, 2 चिमूट पांढरी मिरी पूड, 10 ग्रॅम ओव्याची पानं (बारीक चिरलेली), 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 50 ग्रॅम ब्रेडचा चुरा,
100 ग्रॅम उकडलेले बटाटे, स्वादानुसार मीठ, तळण्याकरिता तेल.
कृती : पनीर, चीज, बटाटे आणि मक्याचे दाणे व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणात ओव्याची पानं, पांढरी मिरी पूड, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम पनीर कॉर्न चीज बॉल्स चिली सॉससोबत सर्व्ह करा.

चीज ऑनियन रोल
साहित्य : अर्धा कप चीज,  3 कांदे (उभे पातळ चिरलेले), 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), स्वादानुसार मीठ व पांढरी मिरी पूड,  100 ग्रॅम मैदा, मोहनासाठी थोडं तूप, अर्धी वाटी बेसन,  तळण्याकरिता तेल.
कृती : पॅनमध्ये चीज विरघळवून त्यात कांदा परतवून घ्या. त्यात पांढरी मिरी पूड, मीठ व हिरवी मिरची एकत्र करून आचेवरून उतरवा. मैद्यामध्ये थोडं तुपाचं मोहन, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. या पिठाच्या पुर्‍या लाटून त्यामध्ये कांद्याचं मिश्रण भरा आणि रोल तयार करा. हे रोल बेसनामध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.

खस्ता पनीर
साहित्य : 100 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, 4 पापडांचा चुरा, 4 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 25 ग्रॅम काश्मिरी लाल मिरची पूड, 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 100 ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, 20 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ग्रॅम चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ, तळण्याकरिता तेल.
कृती : पापडाच्या चुर्‍यामध्ये चिली फ्लेक्स एकत्र करून घ्या. एका बाऊलमध्ये हिरवी मिरची, मीठ, आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल मिरची पूड, कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर एकत्र करा. या मिश्रणात पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता हे पनीरचे तुकडे पापडाच्या चुर्‍यामध्ये घोळून गरम तेलामध्ये तळून घ्या. गरमागरम खस्ता पनीर टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

बदाम लाडू
साहित्य : अर्धा कप तूप, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, अर्धा कप बदामाची जाडसर पूड, 2 टेबलस्पून खसखस, 2 कप पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड.
कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करा. त्यात गव्हाचं पीठ आणि रवा तीन-चार मिनिटं परतवून घ्या. त्यात बदामाची पूड आणि खसखस मिसळून आणखी दोन-तीन मिनिटं खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्या. आता हे मिश्रण तासभर थंड होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण पूर्णतः थंड व्हायला हवं. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळा.  मिश्रण चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळा.
टीप : बदामाचे हे लाडू आठ दिवस चांगले टिकतात.

पायनॅपल शिरा लाडू
साहित्य : एक तृतीयांश कप तूप, 200 मिलिलीटर अननसाचा रस, 1 कप रवा, एक तृतीयांश कप साखर, 1 टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड, पाव टीस्पून पायनॅपल इसेन्स, काही थेंब खाण्याचा पिवळा रंग.
सारणासाठी : 1 टीस्पून तूप, पाव कप काजूचे तुकडे, 2 टीस्पून मनुका, सजावटीसाठी काही काजूचे तुकडे.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करा. त्यात पाच-सहा मिनिटं रवा खमंग भाजून घ्या. आता त्यात साखर आणि अननसाचा रस मिसळून मिश्रण पूर्णतः कोरडं होईपर्यंत परतवा. त्यात उर्वरित सर्व साहित्य मिसळून चांगलं परतवून घ्या. आता वेगळ्या भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात काजूचे तुकडे आणि मनुका घालून तळून घ्या. आता अननसाचा थोडा शिरा घेऊन त्यात, थोडं काजू-मनुकांचं मिश्रण भरा आणि लाडू वळून घ्या. प्रत्येक लाडवावर एक-एक काजूचा तुकडा लावून सजवा आणि सर्व्ह करा.

मलई मालपोहा
साहित्य : मालपोहा तयार करण्यासाठी : 1 कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून दुधाची पूड, अर्धा कप दूध, आवश्यकतेनुसार पाणी,  सजावटीसाठी चांदीचा वर्ख.
साखरेचा पाक तयार करण्यासाठी : 1 कप साखर, अर्धा कप पाणी, 1 टीस्पून केशर, अर्धा टीस्पून वेलची पूड, चिमूटभर खायचा पिवळा रंग.
सारणासाठी : पाव कप घट्ट मलई, 200 ग्रॅम मावा, अर्धा कप पिठीसाखर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा कप बदाम-पिस्त्याचे काप, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : मालपोह्यासाठीचं चांदीचा वर्ख सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये घेऊन चांगलं एकजीव करून घ्या. मऊ मिश्रण तयार व्हायला हवं. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. पाक तयार करण्यासाठी साखर आणि पाणी एकत्र करून जाड बुडाच्या भांड्यात आठ ते दहा मिनिटं उकळत ठेवा. वेगळ्या भांड्यात सारणासाठीचं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर दोन-तीन मिनिटं शिजवा. मिश्रण दाट व्हायला हवं. या मिश्रणाचे समान आकाराचे भाग करून बाजूला ठेवून द्या. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर मालपोह्याचं मिश्रण पसरवा. लहानसा मालपोहा थोडं तूप पसरवून दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. प्रत्येक मालपोहा दोन मिनिटांसाठी साखरेच्या पाकात बुडवा. आता एका ताटामध्ये काही मालपोहे ठेवा. प्रत्येक मालपोह्यावर सारणाचं थोडं मिश्रण ठेवून, त्याची गुंडाळी करा. मालपोह्याचे हे रोल मायक्रोवेव्ह-प्रूफ सर्व्हिंग डिशमध्ये सजवून, त्यावर उर्वरित साखरेचा पाक पसरवा. मालपोहा सर्व्ह करण्यापूर्वी दोन-तीन मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. गरमागरम मालपोहा चांदीचा वर्ख लावून सजवा आणि सर्व्ह करा.

फ्रूट श्रीखंड
साहित्य : 2 लीटर घट्ट मलईयुक्त दही, 1 कप पिठीसाखर, अडीच कप मिश्र फळांचे बारीक तुकडे (संत्रं, सफरचंद, चिकू, डाळिंब).
कृती : एका भांड्यात चाळण ठेवून त्यात दही घाला आणि हे भांडं आठ ते दहा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर हे दही अन्य भांड्यात काढून, त्यात साखर घाला आणि हँड ब्लेंडरने व्यवस्थित घुसळून घ्या. आता त्यात फळांचे तुकडे मिसळा आणि पुन्हा सेट होण्यासाठी तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रूट श्रीखंड थंडगार सर्व्ह करा.

बदामाचा हलवा
साहित्य : 100 ग्रॅम बदाम (5-6 तास भिजवून, नंतर सालं काढलेले), 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ, 4 टेबलस्पून तूप, 100 मि.लि. दूध, 80 ग्रॅम साखर, 2 टेबलस्पून मिश्र सुकामेव्याचे काप, चिमूटभर वेलची पूड.
कृती : बदाम मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात बदामाची पेस्ट व गव्हाचं पीठ घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. नंतर त्यात दूध, मिश्र सुकामेवा, वेलची पूड आणि साखर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. साखर मिश्रणात व्यवस्थित एकत्र होऊन, ते शिजले की आचेवरून उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

मावा खोबरंपाक
साहित्य : पाव कप तूप, 3 कप किसलेलं खोबरं, 200 ग्रॅम मावा, पाव कप दूध, 1 कप पिठीसाखर, 1 टीस्पून केशर, 1 टीस्पून वेलची पूड, काही थेंब खायचा पिवळा रंग, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.
कृती : एका भांड्यात तूप गरम करा. त्यात खोबरं मिसळून सहा-सात मिनिटं शिजवा. नंतर त्यात मावा आणि दूध मिसळून सहा-सात मिनिटं शिजवा. मिश्रण कोरडं व्हायला हवं. हे मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्या. साधारण तासाभरात ते थंड होईल. नंतर त्यात उर्वरित साहित्य घालून चांगलं एकजीव करा. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून घ्या. त्यात हे मिश्रण घालून, पसरवून एकसमान करा. त्यावर चांदीचा वर्ख पसरवा आणि वड्या पाडा.

पायसम
साहित्य : 2 लीटर दूध, 2 कप साखर, दीड टेबलस्पून तांदूळ, 6 बदाम (5-6 तास भिजवून, सालं काढून, काप केलेले), थोडे काजू व मनुका, चिमूटभर वेलची पूड, 2 टेबलस्पून तूप.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात काजू, मनुका व तांदूळ सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतवून घ्या. दुसर्‍या जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळवून त्यात तुपात परतवलेले काजू, मनुका व तांदूळ घालून मंद आचेवर शिजवा. मध्ये मध्ये ढवळत राहा. तांदूळ शिजल्यावर त्यात साखर घालून 4-5 मिनिटं शिजवा. नंतर वेलची पूड घालून एकत्र करा. पायसम थंड होऊ द्या आणि थंडगार पायसम बदामाचे काप घालून सजवा आणि सर्व्ह करा.

केशर पेढा
साहित्य : 2 लीटर दूध, पाव टीस्पून तुरटीची पूड, दीड कप पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून केशर भाजून कुस्करलेलं, 1 चिमूट खायचा पिवळा रंग, सजावटीसाठी थोडे बदाम-पिस्त्याचे काप.
कृती : जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करत ठेवा. साधारण 20-25 मिनिटांत ते आटून एक चतुर्थांश राहील. आता त्यात तुरटीची पूड मिसळून मावा तयार होईपर्यंत शिजवा. मावा तयार झाल्यानंतर, तो पूर्णतः थंड होऊ द्या. यासाठी साधारण एक-दोन तास लागतील. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, केशर आणि पिवळा रंग घालून व्यवस्थित एकजीव करा. या मिश्रणाचे पेढे तयार करून घ्या.
त्यावर बदाम-पिस्त्याचे काप लावून सर्व्ह करा.
टीप : हे केशर पेढे तीन-चार दिवस चांगले टिकतात.

अंगुरी रबडी
साहित्य : 1 कप ताजा चक्का (स्मॅश केलेला), दीड लीटर दूध, दीड कप साखर, अर्धा कप मिश्र सुकामेवा, चिमूटभर केशर (2 टेबलस्पून दुधामध्ये एकत्र केलेलं), 2 टीस्पून केशर-वेलची सिरप, 1-2 थेंब खाण्याचा नारिंगी रंग.
कृती : चक्क्यामध्ये नारिंगी रंग एकत्र करून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. एका पॅनमध्ये 3 कप पाणी आणि अर्धा कप साखर एकत्र करून मोठ्या आचेवर सतत ढवळत राहा. अशा प्रकारे साखरेचा पाक तयार करून घ्या. या पाकात एकेक करून चक्क्याचे गोळे घाला आणि 15 मिनिटं उकळवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. रबडी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवून त्याचं प्रमाण अर्ध होईपर्यंत उकळवा. त्यात केशराचं दूध, उर्वरित साखर, केशर-वेलची सिरप आणि सुकामेवा घालून साखर विरघळेपर्यंत शिजू द्या. नंतर रबडी आचेवरून उतरवा. अंगुरी चक्क्याच्या गोळ्यांना दाबून त्यातील साखरेचा पाक काढून घ्या. एका बाऊलमध्ये हे चक्क्याचे गोळे घालून त्यावर रबडीचं मिश्रण घाला. वरून सुकामेव्याचे काप घालून सजवा आणि दोन तासांकरिता सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या.
नंतर थंडगार अंगुरी रबडी सर्व्ह करा.