कैरीची उडदमेथी (Raw mango With Udad And Methi)

कैरीची उडदमेथी (Raw mango With Udad And Methi)

कैरीची उडदमेथी

 

साहित्य : 1 मोठी आंबट कैरी, 1 टेबलस्पून किसलेला गूळ, 1 टीस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून मेथीदाणे,1 टीस्पून धणे,
1 टीस्पून तांदूळ, 3 सुक्या लाल मिरच्या, 3 टेबलस्पून खोवलेलं खोबरं, अर्धा टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ, 2 टीस्पून तेल.
फोडणीसाठी ः अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून मेथीदाणे, चिमूटभर हिंग, काही कढीपत्ते.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन, तासून घ्या. कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करा. नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईमध्ये अर्धा टीस्पून तेल गरम करून, त्यात उडीद डाळ, मेथीदाणे, धणे, तांदूळ आणि लाल मिरच्या घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. नंतर मिश्रण साधारण थंड होऊ द्या. आता खोबर्‍यात हळद घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
त्यात हा परतवलेला मसाला घालून अगदी बारीक वाटून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईत उर्वरित तेल गरम करून, त्यात मोहरी, मेथीदाणे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करा. फोडणी तडतडली की, त्यात कैरीचे तुकडे घालून चार-पाच मिनिटं परतवा. नंतर त्यात थोडं पाणी घालून झाकण लावा आणि कैरीच्या फोडी शिजू द्या. कैरी शिजली की, त्यात गूळ आणि मीठ एकत्र करा. पुन्हा झाकण लावून तीन-चार मिनिटं शिजवा. आता त्यात मसाल्याचं वाटण घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. मंद आचेवर थोडा वेळ शिजवा आणि गरमागरम कैरीची उडदमेथी भात किंवा चपाती-भाकरीसोबत सर्व्ह करा.

टीप : आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात पाणी घालून ही कैरीची उडदमेथी दाटसर किंवा पातळ करा.