रक्षाबंधन स्पेशल: श्रीखंड रोल, मावा कोकोनट जॅम ...

रक्षाबंधन स्पेशल: श्रीखंड रोल, मावा कोकोनट जॅम रोल (Rakshabandhan Special: Different Flavour Sweet Recipes)

मावा श्रीखंड रोल

श्रीखंड रोल, मावा कोकोनट जॅम रोल, Sweet Recipes साहित्य : 1 कप मावा, अर्धा कप श्रीखंड, 1 टेबलस्पून वेलची पूड, 1 टेबलस्पून काजू पूड, 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून पिस्त्याची पूड. कृती ः कढईत मावा घालून मंद आचेवर पाच ते दहा मिनिटं परतवून घ्या. नंतर तो थंड होऊ द्या. मावा थंड झाल्यावर व्यवस्थित मळा आणि त्याचा एक गोळा तयार करा. हा गोळा लाटून, चौकोनी आकारात कापून घ्या. आता माव्याच्या पोळीवर श्रीखंड पसरवा. त्यावर काजू-पिस्त्याची पूड, खोबरं पसरवून, अलगद दाबून रोल तयार करा. रोलवर वेलची पूड भुरभुरा. हे रोल 10 मिनिटं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. रोल थोडे कडक झाले की, फ्रीजमधून बाहेर काढा आणि त्याचे साधारण 2 इंच लांबीचे रोल कापा. टीप :

  • श्रीखंड शिल्लक राहिलं की, वेगळं काहीतरी म्हणून असा मावा श्रीखंड रोल तयार करता येईल.
  • हा रोल तयार करताना वेगळेपणा म्हणून, मावा भाजल्यानंतर त्यात सर्व साहित्य एकजीव करून रोल तयार करता येईल किंवा मावा भाजल्यानंतर मावा सोडून उर्वरित सर्व साहित्य एकजीव करून, ते माव्याच्या पोळीवर पसरवून रोल तयार करता येईल.

मावा कोकोनट जॅम रोल

श्रीखंड रोल, मावा कोकोनट जॅम रोल, Sweet Recipes साहित्य : अर्धा कप मिक्स फ्रुट जॅम, 1 कप मावा, अर्धा कप खोबर्‍याचा कीस, 1 टेबलस्पून पिठीसाखर, 1 टेबलस्पून काजू पावडर, 1 टेबलस्पून खसखस. कृती : प्रथम एका कढईमध्ये मावा पाच ते दहा मिनिटं चांगला परतून घ्या. नंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. आता चांगला मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करा. एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटा. नंतर त्यावर जॅम लावा. आणि तसेच फ्रीजमध्ये दहा मिनिटांसाठी ठेवा. तोपर्यंत एका भांड्यात खोबर्‍याचा कीस, पिठीसाखर, काजू पावडर, खसखस एकत्र करून घ्या. नंतर जॅम लावलेली पोळी बाहेर काढा आणि त्यावर हे मिश्रण घाला आणि हलक्या हाताने त्याचा रोल बनवा. आता पुन्हा 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजमधून बाहेर काढून एक इंच आकाराचे रोल कापा. मुलांना डब्यात आणि गणपतीला प्रसाद म्हणून द्यायला ही पाककृती नवीन आहे.

चिकू पराठा आणि स्टफ चिकू (Different Chikoo Recipes)