झटपट टिफिन रेसिपीज (Quick Tiffin Recipes)

झटपट टिफिन रेसिपीज (Quick Tiffin Recipes)

आले पाक
साहित्य : 1 वाटी तासलेले आल्याचे तुकडे, 2 वाटी साखर, अर्धा वाटी सायीसकट दूध, 1 चमचा तूप.
कृती : आलं अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये आल्याचं वाटण, साखर आणि दूध एकत्र करा आणि मध्यम आचेवर शिजत ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू साखर विरघळून घट्ट होऊ लागेल. मिश्रण कडेपासून सुटू लागलं की, आच बंद करा आणि लगेच तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये घालून पसरवा. गरम सुरीने वड्या पाडा. मिश्रण थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा आणि हवाबंद डब्यात भरा.

आवळा कँडी
साहित्य : 1 किलो आवळे, 700 ग्रॅम साखर.
कृती : आवळे स्वच्छ धुऊन, पाण्यात उकळत ठेवा. साधारण 2-3 मिनिटं आवळे चांगले उकळले की, आचेवरून उतरवा आणि पाणी निथळून घ्या. आवळे पूर्णतः थंड होऊ द्या. आता आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. त्यात साखर एकत्र करून झाकण लावा आणि तीन दिवस मुरायला ठेवून द्या. नंतर आवळे गाळून ताटात किंवा ट्रेमध्ये ठेवा. हे ताट दोन दिवस उन्हात ठेवा, म्हणजे आवळे व्यवस्थित सुकतील. सुकलेल्या आवळ्यांवर आवडत असल्यास पिठीसाखर भुरभुरा. ही आवळा कँडी स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.

सुंठेचे लाडू
साहित्य : 1 वाटी सुंठ पूड, 1 वाटी खारीक पूड, 1 वाटी बदाम पूड, 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून आळीव, 2 वाटी किसलेलं सुकं खोबरं, स्वादानुसार जायफळ पूड, 1 टीस्पून जायपत्री पूड, आवडीनुसार दळलेली साखर किंवा किसलेला गूळ, आवश्यकतेनुसार साजूक तूप.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात खसखस परतवून घ्या. नंतर त्यातच आळीव घालून, ते फुलल्यावर आच बंद करा. नंतर त्यात खोबरं, खारीक पूड, बदामाची पूड, सुंठ, जायफळ पूड आणि जायपत्री पूड घालून एकत्र करा. नंतर त्यात दळलेली साखर किंवा गूळ घाला. आवश्यकता वाटल्यास थोडं पातळ साजूक तूप घाला आणि एकजीव मिश्रण तयार करा. थोडा वेळ मिश्रण झाकून ठेवून, नंतर त्याचे लाडू वळा.

डिंकाचे लाडू
साहित्य : 2 वाटी डिंक, 3 वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, 2 वाटी खारकेची पूड, अर्धा वाटी कुटलेली खसखस, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी तूप, 3 वाटी किसलेला गूळ, 1 वाटी दळलेली साखर, 1 वाटी बदामाचे बारीक तुकडे, स्वादानुसार जायफळाची पूड.
कृती : डिंक जाडसर कुटून घ्या. खारकेतील बी काढून, ते बारीक वाटून घ्या. बदाम हलके भाजून त्यांचीही बारीक पूड करून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्या. त्याचप्रमाणे गरम तुपात खसखस परतवून घ्या. एका कढईत तूप गरम करून, त्यात थोडा थोडा डिंक फुलवून (तळून) घ्या.
आता एका मोठ्या परातीमध्ये तळलेला डिंक, खारीक पूड, बदामाची पूड, खसखस, जायफळ पूड आणि खोबरं घालून व्यवस्थित एकत्र करा. त्यात किसलेला गूळ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. थोडा वेळ मिश्रण झाकून ठेवून, नंतर त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळा.
टीप : लाडवाचं मिश्रण कोरडं वाटल्यास थोडं साजूक तूप गरम करून घालता येईल.

सुंठ-मेथी-डिंक लाडू
साहित्य : 1 कप गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून मेथीदाणे, 2 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून सुंठ पूड, 1 टीस्पून काळी मिरी, पाऊण कप साखर, अर्धा कप साजूक तूप, थोडे बारीक चिरलेले बदाम व पिस्ते.
कृती : एका पॅनमध्ये बडीशेप, मेथीदाणे आणि काळी मिरी कोरडीच भाजून घ्या. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. एका कढईमध्ये तूप गरम करून मंद आचेवर गव्हाचं पीठ सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या. नंतर आचेवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. आता त्यात उर्वरित सर्व साहित्य घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे मध्यम आकाराचे लाडू तयार करा. हे लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवा. चार ते सहा आठवडे हे लाडू व्यवस्थित टिकतात.