पुरण पोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katach...

पुरण पोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Aamti)

पुरण पोळीसाहित्य :
4 वाटी चणा डाळ, 3 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी तेल.

कृती : गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र चाळून, एकदम मऊ पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यावर सर्व खड्डे भरतील इतकं तेल घालून किमान दोन तासांकरिता हे पीठ तसंच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगलं मळून घ्या. चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चाळणीतून गाळून त्यातील जास्तीचं पाणी बाजूला काढून ठेवा. (या जास्तीच्या पाण्यालाच ‘डाळीचा कट’ म्हणतात. त्यासाठी मुद्दामहून जास्त पाणी घालून डाळ शिजवा.) कढईमध्ये शिजलेली चण्याची डाळ आणि गूळ घालून पूर्णतः कोरडी होईपर्यंत शिजवा. आवडत असल्यास त्यात स्वादानुसार वेलदोड्यांची किंवा जायफळ पूड घाला. हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या. पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
पिठाचा लिंबाच्या आकाराचा आणि पुरणाचा त्याच्या दुप्पट आकाराचा गोळा तयार करा. पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात पुरणाचा गोळा घालून बंद करा. हा गोळा हाताच्या तळव्यावर ठेवून अलगद दाबा. नंतर तांदळाचं भरपूर पीठ लावून पोळी लाटा. पोळी लाटताना अधूनमधून हातावर घेऊन पोळपाटाला चिकट नाही, याची खात्री करून घ्या. पोळी लाटतानाही त्यास मधूनमधून तांदळाचं पीठ लावत राहा. तवा अगदी मंद आचेवर गरम करा. पोळीवर तळहात ठेवून पोळपाट उलटं करा आणि ही पोळी अलगद गरम तव्यावर ठेवा. पोळी मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम पुरण पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करा.

टीप
पोळी अगदी पातळ लाटता यावी, यासाठी पीठ लवचीक असायला हवं, म्हणूनच ते चांगलं मऊ मळून घ्या आणि तेल मुरण्यासाठी काही तास ठेवून द्या.
पुरण पोळी प्रथम लहान लाटा. नंतर जमेल तसा तिचा आकार वाढवा.
पुरण पोळी तुटू नये किंवा पोळपाटाला चिकटू नये, यासाठी पोळीच्या गोळ्याला आणि पोळी लाटतानाही तांदळाचं भरपूर पीठ वापरा. पोळी लाटून झाल्यावर तव्यावर टाकण्यापूर्वी ते कमी करा.
पुरण पोळी कधीही बोटांनी उचलू नका. पोळीवर तळहात ठेवून पोळपाट उलटं करा, म्हणजे पोळी हातावर येईल.
पुरणापेक्षा पीठ जास्त झालं की, पोळीच्या कडांना अधिक पीठ दिसतं. असं झाल्यास, पुढची गोळी तयार करताना थोडं कमी पीठ वापरा.
पुरण पोळी लाटताना बाहेरच्या बाजूस लाटल्यास पोळीमध्ये सर्वत्र पुरण पसरतं आणि आवरणही तुटत नाही.
पुरणामध्ये खवा घालायचा असल्यास, तो पुरण शिजवतानाच घाला. पोळी छान लागते.
पुरण शिजवतानाच त्यात थोडं सुंठ आणि आलं बारीक करून घाला, म्हणजे पुरण पचायला हलकं होतं.
पुरण तयार करताना, त्यात चणा डाळीच्या प्रमाणाच्या पाव पट तुरीची डाळ घातल्यासही पुरण पचायला हलकं होतं.
पुरण शिजवताना त्यात थोडं मीठ आणि जायफळ घाला, पुरण पोळी चविष्ट होते.
पुरण शिजवताना डाळीसोबत मूठभर तांदूळ घाला, म्हणजे पुरण चांगलं घट्ट होतं.
पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घाला. पोळ्या हलक्या होतात.

 

कटाची आमटीसाहित्य :
6 वाटी चण्याच्या डाळीचा कट (डाळ शिजवल्यावर त्यातील जास्तीचं पाणी), 1 वाटी चण्याची शिजवलेली डाळ, 1 टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ, 4-5 टीस्पून किसलेला गूळ, 4 टीस्पून सुकं खोबरं, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून काळा मसाला, 2 टीस्पून लाल तिखट, स्वादानुसार मीठ.

फोडणीसाठी : 2 टीस्पून तेल, प्रत्येकी 1 टीस्पून मोहरी, हिंग व हळद, 3-4 लवंगा, 2 मोठे तुकडे दालचिनी, 4-5 तमालपत्रं, 5-6 कडिपत्त्याची पानं.

कृती : शिजवलेली चण्याची डाळ घोटून त्यात कटाचं पाणी घाला आणि एकजीव करून घ्या. नंतर त्यात चिंचेचा कोळ, तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून मध्यम आचेवर ठेवा. दुसर्‍या आचेवर कढई ठेवून त्यात सुकं खोबरं आणि जिरं खमंग भाजून घ्या. नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. डाळीला उकळी फुटू लागली की, त्यात खोबरं-जिर्‍याची पूड घाला. नंतर गूळ आणि काळा मसाला घालून व्यवस्थित एकत्र करा. फोडणीच्या पळीत तेल चांगलं गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी द्या. नंतर त्यात लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि कडिपत्त्याची पानं घाला. ही फोडणी डाळीवर घालून मिश्रण एकजीव करून एक चांगली उकळी येऊ द्या.

टीप :
चण्याची डाळ मुद्दाम शिजवून, चांगली घोटून त्यात पाणी घालूनही कट तयार करता येतो. काळा मसाला नसल्यास गोडा मसालाही वापरता येईल.